TEXT 2
idaṁ jñānam upāśritya
mama sādharmyam āgatāḥ
sarge ’pi nopajāyante
pralaye na vyathanti ca
इदम्-हे; ज्ञानम्-ज्ञान; उपाश्रित्य-आश्रय घेऊन; मम-माझ्या; साधर्म्यम्-समान स्वभावाला; आगताः-प्राप्त करून; सर्गे अपि-सृष्टीमध्येही; न-कधीही नाही; उपजायन्ते-जन्म घेतात; प्रलये-प्रलयामध्ये; न-नाही; व्यथन्ति-व्यथित होतात; च-सुद्धा.
या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही.
तात्पर्यः परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मकदृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो, अर्थात तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. तथापि, तो आपले वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही. वेदांतून कळून येते की, आध्यात्मिक विश्वातील वैकुंठ लोकांची प्राप्ती झालेले मुक्त जीव भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेतात. म्हणून मोक्षप्राप्तीनंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत नाही.
सामान्यतः भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते. जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात. ज्याक्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्याक्षणी तो भगवंतांच्याच स्तरावर स्थित होतो. ज्यांना वैंकुंठलोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की, भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपही वैविध्यहीन बनून निराकार बनते. तथापि, या जगतामध्ये प्राकृत वैविध्य आहे. तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असतेच. या वैविध्यतेचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटते की, आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगतातील वैविध्याहून पूर्णपणे भिन्न आहे. परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तेथील सर्व कर्म आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असे म्हटले जाते. तेथील वातावरण निर्दीष असते आणि तेथे मनुष्य गुणात्मकदृष्ट्या भगवंतांशी एकरूप असतो. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे. याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो, तो भौतिक जगताच्या उत्पत्तीने तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही.