No edit permissions for मराठी

TEXT 3

mama yonir mahad brahma
tasmin garbhaṁ dadhāmy aham
sambhavaḥ sarva-bhūtānāṁ
tato bhavati bhārata

मम-माझे; योनिः-जन्मस्रोत; महत्-संपूर्ण प्राकृत सृष्टी; ब्रह्म-परम किंवा ब्रह्म; तस्मिन्-त्यामध्ये;गर्भम्-गर्भ, दधामि—उत्पन्न करतो; अहम्—मी; सम्भवः—शक्यता; सर्व-भूतानाम्— सर्व जीवांचा; ततः-त्यानंतर; भवति-होतो; भारत-हे भारता.

हे भारता! ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्त्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो; यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो.

तात्पर्य: जगताविषयीचे हे विस्तृत वर्णन आहे. जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र (शरीर) आणि क्षेत्रज्ञाच्या (आत्मा) संयोगामुळे घडते. भौतिक प्रकृती आणि जीवाचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतांमुळे होते. महत्तत्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणांचा समावेश असणा-या या महत्तत्वालाच कधी कधी ब्रह्म म्हटले जाते. परमपुरुष महत्तत्वामध्ये गर्भधारणा करतात. आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते. या महत्तत्वाचे वेदांमध्ये (मुण्डकोपनिषद् १.१.९) ब्रह्म असे वर्णन करण्यात आले आहे, तस्मादेतद् ब्रह्म नामरूपमत्रं च जायते परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात. आकाश, जल, तेज आणि वायू इत्यादींसहित सर्व चोवीस तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महद्ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात. सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे व तिला परा प्रकृती, जीव असे म्हणतात. भौतिक प्रकृतीशी परा प्रकृतीचा संयोग हा भगवंतांच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो.

          भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधी कधी म्हटले जाते की, विंचू तांदळापासून जन्मतो; परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की, जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे तो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभव्यक्तीचे कारण भगवंत आहेत.

« Previous Next »