TEXT 16
kiṁ karma kim akarmeti
kavayo ’py atra mohitāḥ
tat te karma pravakṣyāmi
yaj jñātvā mokṣyase ’śubhāt
किम्-काय आहे; कर्म-कर्म; किम्-काय आहे; अकर्म-अकर्म; इति-याप्रमाणे; कवय:- बुद्धिमान; अपि-सुद्धा; अत्र-या बाबतीत; मोहिता:- मोहित झाले आहेत; तत्-ते; ते-तुला; कर्म-कर्म; प्रवक्ष्यामि-मी विवेचन करून सांगतो; यत्-ते; ज्ञात्वा-जाणून; मोक्ष्यसे-तू मुक्त होशील; अशुभात्-अशुभातून.
कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्मांचे वर्णन करतो जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील.
तात्पर्य: कृष्णभावनाभावित कर्म हे भक्तांच्या उदाहरणावरून करावयाचे असते. पंधराव्या श्लोकात याचा निर्देश केला आहे. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये यासंबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल.
कृष्णभानाभावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. कृष्णभावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली, सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला सांगितली, मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आलेली आहे. म्हणून मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिह्नांचे अनुसरण केले पाहिजे. नाही तर बुद्धिमान मनुष्यही आदर्श कृष्णभावनायुक्त कर्मांबद्दल गोंधळून जातील. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्णभावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्णभावनेचे ज्ञान दिल्याने, जो अर्जुनाच्या पदचिह्नांचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही.
असे सांगितले जाते की, केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतंच सांगू शकतात. धर्मं तू साक्षात्भगवत्प्रणीतम (श्रीमद्भागवत 6.3.19) अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्मा, शिव, नारद, मनू, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिह्नांचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? ते जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तांवर अहैतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्णभावनाभावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते.