TEXT 25
yānti deva-vratā devān
pitṝn yānti pitṛ-vratāḥ
bhūtāni yānti bhūtejyā
yānti mad-yājino ’pi mām
यान्ति-जातात; देव-व्रता:-देवतांचे उपासक; देवान्-देवतांकडे; पितृन्-पितरांना; यान्ति-प्राप्त होतात किंवा जातात; पितृ-व्रताः-पितरांचे पूजन करणारे; भूतानि-भूत-प्रेतांकडे; यान्ति-जातात; भूत-इज्या:-भूतांचे उपासक; यान्ति-प्राप्त होतात किंवा जातात; मत्-माझे; याजिनः-भक्त; अपि-परंतुः माम्—मला.
जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात, ते पितरांकडे जातात, जे भूतांची उपासना करतात, त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात.
तात्पर्य: जर कोणाला चंद्र, सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला, वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकांची प्राप्ती होऊ शकते, जसे, दशपौर्णिमासी विधी याचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये निरनिराळ्या ग्रहलोकांच्या अधिष्ठात्री देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकांची प्राप्ती होऊ शकते. तसेच मनुष्य, भूतांच्या ग्रहांवर जाऊ शकतो आणि यक्ष, राक्षस किंवा पिशाच्च बनू शकतो. पिशाच्चोपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात. इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय, असे त्यांना वाटते; परंतु वस्तुतः अशी सर्व कार्ये पूर्णपणे भौतिक आहेत. त्याचप्रमाणे केवळ भगवंतांचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निःसंदेह वैकुंठलोकाची आणि कृष्णलोकाची प्राप्ती करतो. या महत्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की, जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा जादूटोणा केल्याने भूतलोकांची प्राप्ती होऊ शकते. तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा श्रीविष्णुलोकांची प्राप्ती का होऊ शकणार नाही? दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूंचे निवास असणा-या अशा दिव्य लोकांचे ब-याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होती. यास्तव कृष्णभावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव-समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरेकृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवद्धामात परत जाऊ शकतो.