TEXT 3
paśyaitāṁ pāṇḍu-putrānām
ācārya mahatīṁ camūm
vyūḍhāṁ drupada-putreṇa
tava śiṣyeṇa dhīmatā
पश्य- पहा; एताम्- ही; पाण्डु-पुत्राणाम्- पांडूच्या पुत्रांची; आचार्य-हे आचार्य; महतीम्- विशाल; चमूम्-सैन्यदल; व्यूढाम्- व्यूहरचना; द्रुपद-पुत्रेण - द्रुपद पुत्राने; तव-तुमचा; शिष्येण-शिष्य; धीमता-अत्यंत बुद्धिमान.
हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य, द्रुपदपुत्र, याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडवसेना पहा.
तात्पर्य : मुत्सद्दी दुर्योधनाला, आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य, यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वत:कडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेली युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकरची तडजोड न करता दक्ष राहावे, म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की, पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषत: अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वांत प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला.