No edit permissions for मराठी

TEXT 48

na veda-yajñādhyayanair na dānair
na ca kriyābhir na tapobhir ugraiḥ
evaṁ-rūpaḥ śakya ahaṁ nṛ-loke
draṣṭuṁ tvad anyena kuru-pravīra

 
-कधीच नाही; वेद-यज्ञ-यज्ञाने; अध्ययनैः-किंवा वेदाध्ययनाने; -कधीच नाही; दानैः दानाने; -कधीच नाही; -सुद्धा; क्रियाभिः-पुण्यकर्माद्वारे; -कधीही नाही; तपोभिः-तपश्चर्येने; उग्रैः-उग्र किंवा कठोर; एवम्-रूपः-या रूपामध्ये; शक्यः-शक्य; अहम्-मी; नृ-लोके-या भौतिक जगतामध्ये; द्रष्टुम्-पाहणे; त्वत्-तुझ्यावाचून; अन्येन-दुस-या कोणी; कुरु-प्रवीर-हे कुरुप्रवीर, कुरू योद्धयांमध्ये श्रेष्ठ.

हे कुरुप्रवीर! तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही.

तात्पर्य: या संदर्भात, दिव्य दृष्टी म्हणजे काय? हे स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. तर ही दिव्य दृष्टी कोणाला असू शकते? दिव्य म्हणजे दैवी होय. जोपर्यंत मनुष्याला देवतेप्रमाणेच दैवी अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला दिव्य दृष्टी मिळू शकत नाही आणि देवता म्हणजे कोण? वेदांमध्ये सांगितले आहे की, जे विष्णुभक्त आहेत ते देवता होत (विष्णुभक्ताः स्मृता देवाः) जे अनीश्वरवादी आहेत, अर्थात जे श्रीविष्णूंना मानीत नाहीत किंवा जे श्रीकृष्णांच्या निर्विशेष तत्वालाच परम सत्य मानतात, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांची निंदा करावयाची आणि त्याचबरोबर दिव्य दृष्टीचीही अपेक्षा करावी हे शक्य नाही. जोपर्यंत मनुष्य दिव्य होत नाही तोपर्यंत त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे ते सुद्धा अर्जुनाप्रमाणेच पाहू शकतात.

          भगवद्गीतेत विश्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. अर्जुनापूर्वी जरी कोणालाच विश्वरूप ज्ञात नव्हते तरी या घटनेनंतर मनुष्याला विश्वरूपाची थोडीफार कल्पना येऊ शकते. जे वास्तविकपणे दैवी आहेत ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकतात. परंतु श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्यावाचून मनुष्य दैवी होऊ शकत नाही. तथापि, जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत आणि ज्यांना दिव्य दृष्टी आहे ते भगवंतांचे विश्वरूप पाहण्यास तितकेसे उत्सुक नसतात. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचे चतुर्भुजरूप पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि वास्तविकपणे विश्वरूप पाहून तो भयभीत झाला होता.

          या श्लोकामध्ये काही महत्वपूर्ण शब्द आहेत. उदाहरणार्थ वेदयज्ञाध्ययनै-यावरून वेदाध्ययन आणि यज्ञासंबंधित यज्ञसंवर्धन विधिविधानांचा निर्देश होतो. वेद हा शब्द संपूर्ण वैदिक शास्त्रांचा म्हणजे ऋग,यजुः, साम आणि अथर्व हे चतुर्वेद, अठरा पुराणे, उपनिषदे आणि वेदान्त सूत्राचा वाचक आहे. एखादा घरी अथवा अन्यत्र त्यांचे अध्ययन करू शकतो. तसेच यज्ञयागाच्या विधींचे अध्ययन करण्याकरिता कल्पसूत्र आणि मीमांसा सूत्र यांसारखी सूत्रे आहेत. दानें म्हणजे ब्राह्मण आणि वैष्णवांसारखे जे दिव्य प्रेममयी भगवत्सेवेमध्ये संलग्न झाले आहेत, त्या सत्पात्रजनांना दान देणे होय. त्याचप्रमाणे पुण्यकर्म या शब्दावरून अग्नीहोत्र आणि विविध वर्णाच्या विहित कर्माचा बोध होतो आणि स्वेच्छेने शारीरिक कष्ट स्वीकारणे म्हणजे तपस्या होय. म्हणून तपस्या, दान, वेदाध्ययन करणे इत्यादी सर्व काही मनुष्य करू शकतो, परंतु जोपर्यंत अर्जुनाप्रमाणे तो भक्त बनू शकत नाही, तोपर्यंत विराट रूप पाहणे त्याला शक्य नाही. जे निर्विशेषवादी आहेत ते सुद्धा भगवंतांचे विश्वरूप पाहात असल्याची कल्पना करतात; परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की, निर्विशेषवादी हे भगवद्भक्त नाहीत. म्हणून ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकत नाहीत.

          असे अनेक लोक आहेत जे अवतारांची निर्मिती करतात. असे लोक, एखादा साधारण मनुष्य अवतार असल्याचा दावा करतात, परंतु हा केवळ मूखपणा आहे. आपण भगवद्गीतेच्या तत्वांचे अनुसरण केले पाहिजे. अन्यथा पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. भगवत्-तत्वाच्या अध्ययनामध्ये भगवद्गीतेला जरी प्राथमिक मानण्यात आले तरी ती इतकी परिपूर्ण आहे की, मनुष्य यथार्थ तत्वज्ञान जाणू शकतो. नकली अवतारांचे तथाकथित भक्त आहे, परंतु ही गोष्ट मानता येत नाही, कारण या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की, कृष्णभक्त झाल्याविना भगवंतांचे विश्वरूप पाहणे शक्य नाही. म्हणून सर्वप्रथम मनुष्याने विशुद्ध कृष्णभक्त बनले पाहिजे, मगच तो आपण पाहिलेले विश्वरूप इतरांनाही दाखवू शकत असल्याचा दावा करू शकतो. कृष्णभक्त हा नकली अवतारांना किंवा तथाकथित अवतारांच्या तथाकथित भक्तांना मान्यता देऊ शकत नाही.

« Previous Next »