TEXTS 1-2
arjuna uvāca
prakṛtiṁ puruṣaṁ caiva
kṣetraṁ kṣetra-jñam eva ca
etad veditum icchāmi
jñānaṁ jñeyaṁ ca keśava
śrī-bhagavān uvāca
idaṁ śarīraṁ kaunteya
kṣetram ity abhidhīyate
etad yo vetti taṁ prāhuḥ
kṣetra-jña iti tad-vidaḥ
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; प्रकृतिम्-प्रकृतीः पुरुषम्-भोक्ता,पुरुष; च-सुद्धा; एव-निश्चितपणे; क्षेत्रम्-क्षेत्र; क्षेत्र-ज्ञम्-क्षेत्राचा ज्ञाता; एव-निश्चितपणे; च-सुद्धा; एतत्-हे सर्व; वेदितुम्-जाणण्याची; इच्छामि-मी इच्छा करतो; ज्ञानम्-ज्ञान; ज्ञेयम्-ज्ञानाचे लक्ष, ज्ञेय; च-सुद्धा; केशव-हे कृष्णः श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; इदम्-हे; शरीरम्-शरीर, कौन्तेय-हे कौंतेया; क्षेत्रम्-क्षेत्र, इति-याप्रमाणे; अभिधीयते-म्हटले जाते; एतत -हे; यः-जो; वेत्ति-जाणतो; तम्--तोः प्राहुः-म्हटले जाते; क्षेत्र-ज्ञः-क्षेत्राचा ज्ञाता; इति-याप्रमाणे; तत्-विदः-हे जाणणारे ज्ञानीजन.
अर्जुन म्हणाला, हे कृष्ण! मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे.
श्रीभगवान म्हणाले, हे कोंतेया! या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते.
तात्पर्य: अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती. या सर्वांबद्दल जेव्हा त्याने श्रीकृष्णांकडे पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे शरीर म्हणजे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र आहे. जीव या संसारात गुरफटलेला असतो व तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या प्रयत्न करीत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते. हे कार्यक्षेत्र म्हणजेच शरीर होय आणि शरीर म्हणजे काय? शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते. बद्ध जीवाला इंद्रियोपभोग करावयाची इच्छा असते आणि इंद्रियोपभोग घेण्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले जाते. म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि ते बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते. आता जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादाम्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील भेद जाणणे फारसे काही कठीण नाही. कोणतीही व्यक्ती जाणू शकते की, बालपणापासून ते वृद्धापकालापर्यंत तिच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात, तथापि व्यक्ती ही तीच राहते. याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये भेद आहे. अशा रीतीने बद्ध जीवात्मा जाणतो की, आपण शरीरापासून भिन्न आहोत. प्रारंभी वर्णन करण्यात आले आहे की, देहिनोऽस्मिन्-जीव हा देहस्थ असतो आणि देहाचे बालपणातून कौमार्यात, कौमार्यातून तारुण्यात आणि तारुण्यातून वृद्धत्वामध्ये स्थित्यंतर होत असते आणि देहाचा स्वामी असणारा जाणू शकतो की देहामध्ये स्थित्यंतरे होत आहेत. हा देहाचा स्वामी म्हणजेच क्षेत्रज्ञ होय. काही वेळा आपण विचार करतो की, 'मी मनुष्य आहे', 'मी स्त्री आहे', 'मी कुत्रा आहे', 'मी मांजर आहे'. या सर्व क्षेत्रज्ञांच्या उपाधी आहेत. परंतु क्षेत्रज्ञ हा शरीरापासून भिन्न असतो. आपण जरी आपले कपडे इत्यादी वापरतो तरी आपण जाणतो की, वापरलेल्या वस्तूंहून आपण भिन्न आहोत. त्याचप्रमाणे थोडेसे चिंतन केल्यास आपण जाणू शकतो की, आपण शरीरापासून भिन्न आहोत. मी, तुम्ही किंवा इतर जे शरीर धारण करतात त्यांना क्षेत्रज्ञ म्हटले जाते आणि शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते.
भगवद्गीतेच्या प्रारंभिक सहा अध्यायांमध्ये क्षेत्रज्ञ (जीव) आणि ज्या स्थितीयोगे तो भगवंतांना जाणू शकतो त्याचे वर्णन करण्यात आले आहे. भगवद्गीतेच्या मधल्या सहा अध्यायांमध्ये भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा व परमात्मा यांतील संबंधांचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आणि जीवांच्या स्वरूपाचे निश्चितरूपाने या अध्यायांमध्ये वर्णन करण्यात आले आहे. जीव हे सर्वच परिस्थितीत अधीन असतात, परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात. पुण्यकर्माद्वारे प्रबुद्ध झाल्यावर ते आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी इत्यादी विविध अवस्थांमध्ये भगवंतांकडे जातात. याचेही वर्णन करण्यात आले आहे. आता, तेराव्या अध्यायाच्या प्रारंभापासून, जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो आणि सकाम कर्म, ज्ञानाचे अनुशीलन आणि भक्तीच्या आधारे भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे. जीवात्मा हा जरी शरीरापासून पूर्णपणे भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो. याचेही विश्लेषण करण्यात आले आहे.