No edit permissions for मराठी

TEXTS 5-6

aśāstra-vihitaṁ ghoraṁ
tapyante ye tapo janāḥ
dambhāhaṅkāra-saṁyuktāḥ
kāma-rāga-balānvitāḥ

karṣayantaḥ śarīra-sthaṁ
bhūta-grāmam acetasaḥ
māṁ caivāntaḥ śarīra-sthaṁ
tān viddhy āsura-niścayān

अशास्त्र-शास्त्रविरुद्ध; विहितम्—निर्देशित: घोरम्—घोर, इतरांसाठी हानिकारक, तप्यन्ते— करतात; ये-जे; तपः-तप; जनाः—लोकः दम्भ-दंभाने; अहङ्कार-आणि अहंकारीपणा; संयुक्ता:-संलग्न झालेले; काम-कामाचे; राग-आणि आसक्ती; बल-बलपूर्वक; अन्विता:- प्रवृत्त; कर्षयन्तः-यातना देत; शरीर-स्थम्-शरीरस्थितः भूत-ग्रामम्—प्राकृत तत्त्वांचा समुदायः अचेतस:-भ्रमित मनोवृत्ती असलेले; माम्-मला; -सुद्धा; एव-निश्चितपणे; अन्त:- अंतर्यामी; शरीर-स्थम्—शरीरस्थित; तान्-त्यांना: विद्धि-जाण: आसुर-निश्चयान्-असुर.

जे लोक दंभ आणि अहंकाराने, शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात त्यांना असुर म्हटले जाते.

तात्पर्य: असे अनेक लोक आहेत, जे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या तपस्या निर्माण करतात. उदाहरणार्थ जे उपोषण अंतस्थ हेतूपूर्वक केले जाते, जसे राजकारणात करतात, त्या उपोषणाचा शास्त्रामध्ये उल्लेख नाही. सामाजिक अथवा राजकीय हेतूसाठी उपोषण करणे हे शास्त्रसंमत नाही. केवळ आध्यात्मिक उन्नतीकरिता उपवास करण्यालाच शास्त्रांची मान्यता आहे. भगवद्गीतेनुसार जे लोक अंतस्थ हेतूने उपोषण करतात ते आसुरी लोक होत. त्यांचे कार्य हे शास्त्रांच्या विरुद्ध असते आणि यामुळे सामान्य लोकांना मुळीच लाभ होत नाही. वस्तुतः ते दंभ, मिथ्या अहंकार, काम आणि विषयोपभोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात. अशा कृत्यांमुळे केवळ, ज्या पंचमहाभूतांनी शरीर बनलेले आहे ती पंचमहाभूतेच नव्हे तर शरीरामध्ये वास करणा-या भगवंतांनाही कष्ट होतात. राजकीय उद्दिष्टप्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक असते. अशा उपोषणांचा वेदामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. आसुरी मनुष्याला वाटेल की, अशा मार्गाने आपण आपल्या शत्रूला किंवा  इतर पक्षाच्या लोकांना आपल्या इच्छांशी सहमत होण्यास भाग पाडू, परंतु कधी कधी अशा उपोषणाने मनुष्याचा मृत्यूही होतो. भगवंत अशा कृत्यांना संमती देत नाहीत व ते म्हणतात की, अशी कृत्ये करणारे लोक म्हणजे असुरच आहेत. अशी प्रदर्शने म्हणजे भगवंतांचा अपमानच  होय, कारण अशी कृत्ये वेदांची अवज्ञा करून आचरली जातात. या संदर्भात अचेतस: हा शब्द महत्वपूर्ण आहे. सामान्य मनःस्थितीच्या लोकांनी शास्त्रातील विधिविधानांचे पालन केलेच पाहिजे. ज्यांची अशी मनःस्थिती नाही ते शास्त्रांची उपेक्षा आणि अवज्ञा करतात व स्वनिर्मित तपाचे आचरण करतात. पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, असुरांचा शेवट कसा होतो हे मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे. अशा लोकांना भगवंत आसुरी लोकांच्या पोटी जन्म घेण्यास भाग पाडतात. परिणामी ते लोक भगवंतांशी असलेला आपला संबंध न जाणता जन्मोजन्मी आसुरी वृत्तीने जगतात. परंतु जर अशा लोकांना वैदिक ज्ञानाचा मार्गदर्शविणा-या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभले तर ते या भौतिक जंजाळातून सुटून परमगतीला प्राप्त होऊ शकतील.

« Previous Next »