No edit permissions for मराठी

अध्याय सतरावा

श्रद्धात्रयविभागयोग

TEXT 1: अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण! जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते सत्त्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात?

TEXT 2: श्रीभगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी तीन प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक.

TEXT 3: हे भारता! विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते.

TEXT 4: सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात.

TEXTS 5-6: जे लोक दंभ आणि अहंकाराने, शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात त्यांना असुर म्हटले जाते.

TEXT 7: प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही तीन प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक.

TEXT 8: सत्त्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार, त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार, रसयुक्त,स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो.

TEXT 9: रजोगुणी मनुष्यांना, अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दु:ख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो.

TEXT 10: तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजविलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते.

TEXT 11: फलाची आकांक्षा न करणारे, आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय,

TEXT 12: परंतु, हे भरतश्रेष्ठा! दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाणा.

TEXT 13: शास्त्रविधींची उपेक्षा करून, प्रसाद वितरित केल्यावाचून, मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो.

TEXT 14: भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरू व मातापित्यांसारख्या जेष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते.

TEXT 15: सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षेब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात.

TEXT 16: आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत

TEXT 17: भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणा-या व केवळ परमेश्वराप्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात.

TEXT 18: सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात.

TEXT 19: आत्म-पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात, त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते.

TEXT 20: कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते.

TEXT 21: परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते.

TEXT 22: अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणा-या दानाला तामसिक दान म्हटले जाते.

TEXT 23: सृष्टीच्या आरंभापासूनच'ॐतत् सत्' हे तीन शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रीत्यर्थ यज्ञ करताना, ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत.

TEXT 24: म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी, शास्त्रोक्त विधिविधानांनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी, या सर्व क्रियांचा ॐकारापासून आरंभ करतात.

TEXT 25: फळाची इच्छा न करता मनुष्याने 'तत्' शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे.

TEXTS 26-27: परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत्‌ या शब्दाने निर्देशिले जाते. अशा यज्ञकत्र्यालाही सत् असे म्हटले जाते. तसेच हे पार्थ! परब्रह्माच्या संतुष्टीप्रीत्यर्थ केल्या जाणा-या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मानाही सत् असे म्हणतात.

TEXT 28: परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते, ते अनित्यच होय. अशा कर्माला'असत्'म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मीसुद्धा व्यर्थच ठरते.

« Previous Next »