TEXT 47
śreyān sva-dharmo viguṇaḥ
para-dharmāt sv-anuṣṭhitāt
svabhāva-niyataṁ karma
kurvan nāpnoti kilbiṣam
श्रेयान्-अधिक श्रेयस्करः स्व-धर्मः-स्वधर्म अर्थात, स्वत:चे प्राप्त कर्म; विगुणः-सदोष रीतीने केलेले; पर-धर्मात्-परधर्मापेक्षा अर्थात, इतरांच्या प्राप्त कर्मापेक्षा; सु-अनुष्ठितात्-पूर्ण रीतीने केलेले; स्वभाव-नियतम्-मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून; कर्म-कर्म, कुर्वन्-केल्याने; न-कधीच नाही; आप्नोति-प्राप्त करतो; किल्बिषम्-पाप.
मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे, परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही.
तात्पर्य: मनुष्याच्या नियत कर्माचे, अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या नियत कर्तव्यांचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणांनुसार केले आहे. मनुष्याने दुस-याच्या कर्माचे अनुकरण करू नये. जो मनुष्य स्वभावतः शूद्राकडून केल्या जाणा-या कर्माकडे आकृष्ट होतो तो जरी ब्राह्मण कुळात जन्मलेला असला तरी स्वत:, आपण ब्राह्मण आहोत असा खोटा दावा त्याने करू नये. याप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार कर्म करावे. भगवत्सेवेप्रीत्यर्थ केलेले कोणतेही कर्म निंद्य नसते. ब्राह्मणांचे कर्म हे निश्चितच सत्वगुणी असत, पण म्हणून जो मनुष्य स्वभावतः सत्वगुणी नाही त्याने ब्राह्मणाच्या कर्माचे अनुकरण करू नये. क्षत्रियाला अनेक निषिद्ध गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ, त्याला शत्रूचा संहार करण्यासाठी हिंसक बनावे लागते आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून कधी कधी असत्यही बोलावे लागते. असा दुटप्पीपणा आणि हिंसा ही राजकीय क्षेत्रामध्ये चालतेच; परंतु याचा अर्थ असा नाही की, क्षत्रियाने आपले कर्तव्य सोडावे आणि ब्राह्मणाचे कर्तव्य करण्याचा प्रयत्न करावा.
भगवंतांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ मनुष्याने कर्म केले पाहिजे. उदाहरणार्थ, अर्जुन हा क्षत्रिय होता आणि विरुद्ध पक्षाशी लढण्यास तो कचरत होता. परंतु असे कर्म जर भगवान श्रीकृष्णांकरिता करावयाचे असेल तर अध:पतन होण्याची भीती नाही. व्यापारी क्षेत्रामध्येही नफा मिळविण्यासाठी व्यापा-याला खोटे बोलावेच लागते आणि जर त्याने असे केले नाही तर त्याला नफा होणे शक्यच नाही. कधी कधी व्यापारी म्हणतो,'अहो! तुम्ही आमचे नेहमीचे गि-हाईक आहात आणि तुमच्याकरिता म्हणून मी नफा घेत नाही.' परंतु मनुष्याने जाणले पाहिजे की, नफ्याशिवाय कोणताही व्यापारी जगू शकत नाही. म्हणून जर एखादा व्यापारी म्हणत असेल की, आपण नफा घेत नाही तर ते असत्य बोलणे अनिवार्य समजले पाहिजे. व्यापा-याला असे वाटता कामा नये की, ज्याअर्थी मी जो व्यवसाय करतो त्यात खोटे बोलणे अनिवार्य आहे, त्याअर्थी आपण आपल्या व्यवसायाचा त्याग करावा आणि ब्राह्मणाचे कर्म करावे. असे करणे शास्त्रसंमत नाही. जर कोणी आपल्या कर्माद्वारे भगवंतांची सेवा करीत असेल तर मग तो मनुष्य क्षत्रिय असो, वैश्य असो अथवा शूद्र असो, त्याला महत्त्व नाही. विविध प्रकारचे यज्ञ करणारे ब्राह्मण कधी कधी प्राण्यांची हिंसा करतात, कारण कधी कधी अशा यज्ञाकरिता पशुहिंसा करावी लागते. त्याचप्रमाणे स्वधर्मानुसार क्षत्रियाने जर शत्रूचा संहार केला तर त्यामुळे त्याला पाप लागत नाही. तिस-या अध्यायामध्ये या विषयांचे स्पष्ट आणि विस्तृत वर्णन केले आहे. त्या ठिकाणी म्हटले आहे की, प्रत्येकाने यज्ञाप्रीत्यर्थ म्हणजे भगवान श्रीविष्णूंप्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. केवळ स्वतृप्तीकरिता केलेले कोणतेही कर्म हे बंधनास कारणीभूत ठरते. निष्कर्ष हाच आहे की, प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट प्राकृतिक गुणांनुसार कर्म केले पाहिजे आणि त्याने केवळ भगवत्सेवा म्हणून कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे.