TEXT 54
brahma-bhūtaḥ prasannātmā
na śocati na kāṅkṣati
samaḥ sarveṣu bhūteṣu
mad-bhaktiṁ labhate parām
ब्रह्म-भूतः-ब्रह्मभूत होऊन; प्रसन्न-आत्मा-पूर्णतया प्रसन्न झालेला; न-कधीच नाही; शोचति-शोक करतो; न-कधीच नाही; काङ्क्षति-आकांक्षा करतो; सम:-समभावाने युक्त झालेला; सर्वेषु-सर्व, भूतेषु-जीव, मत्-भक्तिम्-माझी भक्ती, लभते-प्राप्त करतो; पराम्-दिव्य.
याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते.
तात्पर्य: निर्विशेषवाद्यसाठी ब्रह्म-भूत अवस्थेची प्राप्ती करणे, अर्थात ब्रह्मामध्ये विलीन होणे हेच परमलक्ष्य असते; परंतु साकारवाद्यांसाठी किंवा शुद्ध भक्तांसाठी विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होण्यासाठी अधिक प्रगती करावी लागते. याचा अर्थ आहे की, जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याने ब्रह्म-भूत अवस्था, अर्थात ब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था पूर्वीच प्राप्त केली आहे. ब्रह्माशी एकरूप झाल्याविना भगवत्सेवा करता येत नाही. ब्रह्मस्तराव सेवक आणि सेव्य यांच्यामध्ये भेद नसतो; परंतु तरीही उच्चतर आध्यात्मिक दृष्टीने भेद राहतो.
देहात्मबुद्धीने मनुष्य जेव्हा इंद्रियतृप्त्यर्थ कर्म करतो तेव्हा ते कर्म दुःखाला कारण होते. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य जेव्हा भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा दु:खाचा प्रश्नच उद्भवत नाही. कृष्णभावनामयी भक्ताला शोक किंवा आकांक्षा करण्यासारखी कोणतीही गोष्ट नसते. परमेश्वर परिपूर्ण असल्यामुळे, कृष्णभावनाभावित होऊन परमेश्वराच्या सेवेमध्ये युक्त झालेला जीवही स्वतःमध्ये पूर्ण होतो. तो गढूळ पाणी स्वच्छ झालेल्या एखाद्या नदीप्रमाणे असतो. शुद्ध भक्त कृष्णचिंतनाव्यतिरिक्त इतर काही करीत नसल्यामुळे तो स्वाभाविकच सदैव आनंदी असतो. भगवत्सेवेमध्ये भक्त हा परिपूर्ण असल्याकारणाने तो कोणत्याही भौतिक हानीमुळे दुःखी होत नाही किंवा कोणत्याही भौतिक लाभाची आकांक्षा करीत नाही. त्याला विषयोपभोगाची मुळीच इच्छा नसते, कारण तो जाणतो की, प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे तो भगवंतांचा नित्य दास आहे. या भौतिक जगतामध्ये तो कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणून पाहात नाही. या उच्च-नीच अवस्था बाह्य व क्षणभंगुर आहेत आणि भक्ताला क्षणभंगुर गोष्टींच्या उद्भव-विनाशाशी मुळीच कर्तव्य नसते. त्याच्या दृष्टीने सोन्यालाही दगडाइतकीच किंमत असते. हीच ब्रह्मभूत अवस्था होय आणि शुद्ध भक्ताला या स्थितीची सहजपणे प्राप्ती होते. अशा अवस्थेमध्ये परब्रह्माशी एकरूप होऊन स्वत:चे स्वरूप त्यामध्ये विलीन करण्याची संकल्पना ही नरकतुल्य बनते, स्वर्गलोकांची प्राप्ती करण्याची कल्पना भ्रामक वाटते आणि इंद्रिये ही दात नसलेल्या सर्पाप्रमाणे बनतात. ज्याप्रमाणे दंतविहीन सर्पापासून भयभीत होण्याचे कारण नसते, त्याचप्रमाणे आपोआपच संयमित झालेल्या इंद्रियांचे मुळीच भय राहात नाही. विषयासक्तीने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हे जग दु:खमय असते; परंतु भक्तासाठी हेच जग वैकुंठाप्रमाणे असते. भौतिक सृष्टीतील सर्वोच्च व्यक्ती ही भक्ताच्या दृष्टीने एखाद्या मुंगीप्रमाणेच असते. अशी अवस्था, कलियुगामध्ये विशुद्ध भक्तीचे प्रचार करणा-या भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते.