No edit permissions for मराठी

TEXT 73

arjuna uvāca
naṣṭo mohaḥ smṛtir labdhā
tvat-prasādān mayācyuta
sthito ’smi gata-sandehaḥ
kariṣye vacanaṁ tava

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; नष्टः-नष्ट; मोहः-मोह; स्मृतिः-स्मृती; लब्धा-पुन्हा प्राप्त झाली; त्वत्-प्रसादात्-तुमच्या कृपेने; मया-माझ्याद्वारे; अच्युत-हे अच्युत; स्थितः-स्थित झालो; अस्मि-मी आहे; गत-दूर झाले; सन्देहः-सर्व संदेह, करिष्ये-मी करीन; वचनम्— आज्ञा; तव-तुमच्या.

अर्जुन म्हणाला, हे कृष्ण! हे अच्युत! माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दूढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे.

तात्पर्य: अर्जुनाने दर्शविल्याप्रमाणे जीवांची स्वरूपस्थिती म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. त्याने आत्मसंयमन करावयाचे असते. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की, भगवंताचा नित्य सेवक, ही जीवांची वास्तविक स्वरूपस्थिती आहे. या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होतो आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो. सेवक असणे ही जीवांची वैधानिक स्थिती आहे. जीवाला एकतर मायेची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते. तो जर परमेश्वराची सेवा करीत असेल तर तो आपल्या स्वाभाविक स्थितीत असतो आणि जर त्याने मायेची सेवा करण्याचे ठरविले तर तो निश्चितच बद्ध होतो. मोहवश होऊन जीव या भौतिक प्रकृतीमध्ये सेवा करीत असतो. आपल्याच काम आणि वासना यांनी तो बद्ध झालेला असतो, तरीही तो स्वत:ला जगताचा स्वामी मानतो. यालाच माया असे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य मुक्त होतो तेव्हा त्याचा मोह नष्ट होतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसार कर्म करण्यासाठी तो स्वेच्छेने परमेश्वराला शरण जातो. जीवाला अडकविण्यासाठी मायेने टाकलेले शेवटचे जाळे म्हणजे जीवाने स्वत:ला परमेश्वर मानणे होय. जीवाला वाटते की, आपण बद्धात्मा नसून परमेश्वरच आहोत. तो निबुद्ध असल्यामुळे विचारही करीत नाही की, मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झालो असतो. तो या संदर्भात मुळीच विचार करीत नाही. याप्रमाणे माया असा अखेरचा पाश टाकते. वस्तुत: श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तयार होणे म्हणजेच मायेतून मुक्त होणे होय.

           या श्लोकातील मोह हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मोह हा शब्द ज्ञानाच्या विरोधी शब्द आहे. सर्व जीव भगवंतांचे नित्य सेवक आहेत हे जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान होय. परंतु स्वतःला सेवक समजण्याऐवजी तो आपण सेवक नसून भौतिक प्रकृतीचा स्वामी आहोत असे मानतो, कारण त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा असते. हाच त्याचा संमोह होय. या मोहाला भगवंतांच्या अथवा शुद्ध भक्ताच्या कृपेने नष्ट करता येते. जेव्हा असा मोह नष्ट झाल्यावर तो कृष्णभावनाभावित कर्म करण्याचे मान्य करतो.

          कृष्णभावना म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. बहिरंगा शक्तीने मोहित झाल्यामुळे जीव जाणत नाही की, भगवंत हे पूर्ण ज्ञानमय आणि वास्तविक प्रभू आहेत; आपल्या इच्छेनुसार ते भक्ताला काहीही प्रदान करू शकतात; सर्वांचेच मित्र असतात आणि भक्तांविषयी त्यांना विशेष प्रेम असते. ते या भौतिक प्रकृतीचे आणि सर्व जीवांचे नियंत्रक आहेत. तेच अव्ययी काळाचेही नियंत्रक आहेत. ते सर्व ऐश्वर्यांनी व सर्व शक्तींनी परिपूर्ण आहेत. भगवंत आपल्या भक्ताच्या पूर्णपणे अधीन होऊ शकतात. जो मनुष्य त्यांना जाणत नाही तो निश्चितच मायेच्या अधीन असतो आणि असा मनुष्य भक्त न होता मायेचा सेवक बनतो. तथापि, भगवंतांकडून भगवद्गीता ऐकल्यावर अर्जुन मोहमुक्त झाला. तो जाणू शकला की, श्रीकृष्ण हे केवळ आपले मित्रच नसून साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. तो भगवंतांना तत्वतः जाणू शकला. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन करणे म्हणजेच श्रीकृष्णांना तत्वतः जाणणे होय. परिपूर्ण ज्ञानाने युक्त झाल्यावर मनुष्य स्वाभाविकतःच श्रीकृष्णांना शरण जातो. जेव्हा अर्जुनाने जाणले की, अनावश्यक लोकसंख्येमध्ये घट करणे ही श्रीकृष्णांचीच योजना आहे तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे मान्य केले. भगवंतांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी त्याने पुन्हा धनुष्यबाण, शस्त्रास्त्रे धारण केली.

« Previous Next »