No edit permissions for मराठी

TEXT 5

na hi kaścit kṣaṇam api
jātu tiṣṭhaty akarma-kṛt
kāryate hy avaśaḥ karma
sarvaḥ prakṛti-jair guṇaiḥ

-नाही; हि-खचितच; कश्चित् - कोणीही; क्षणम्- एक क्षणभर; अपि-सुद्धा; जातु- कोणत्याही काळी; तिष्ठति-राहतो; अकर्म-कृत-काही तरी कर्म केल्यावाचून; कार्यते - करण्यास भाग पाडले जाते; हि-खचितच; अवश:- असाहाय्य होऊन; कर्म-कर्म; सर्व:- सर्व; प्रकृति-जै:- प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या; गुणै:- गुणांनी.

प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असाहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते, म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही.

तात्पर्य : सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्‍न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. आत्म्याच्या उपस्थितीवाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही. भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे, जे आत्म्याद्वारे चालविले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्णाभावनाभावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते; नाही तर तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कार्मांमध्ये संलग्न करणे आवश्यक असते. पण जर आत्मा हा आपल्या स्वाभाविक कृष्णभावनाभावित कर्मामध्ये मग्न झाला तर तो जे काही करतो ते त्याच्या कल्याणासाठीच असते. श्रीमद्भागवतात (1.5.17) याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे.

त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर्भजन्नपक्वोऽथ पतेत्ततो यदि।
यत्र क्ववाभद्रमभूदमुष्य किं को वार्थ आप्तोऽभजतां स्वधर्मत:॥

     ‘‘कृष्णभावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मांचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईटही नाही. पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्णभावनाभावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार?’’ म्हणून कृष्णभावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्णभावनाभावित होण्याच्या अंतिम ध्येयप्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणून  आहे, कारण कृष्णभावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे.

« Previous Next »