TEXT 31
nāyaṁ loko ’sty ayajñasya
kuto ’nyaḥ kuru-sattama
न-कधीच नाही; अयम्-या; लोक-ग्रहलोक; अस्ति-आहे; अयज्ञस्य-यज्ञ न करणाऱ्याला; कुत:- कोठून; अन्य:- इतर; कुरु-सत्-तम-हे कुरुश्रेष्ठा.
हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे?
तात्पर्य: मनुष्य, कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे. पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे. म्हणून वेद हे आपल्याला या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरतेशेवटी या दु:खमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांमुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात. यज्ञ केल्यामुळे, जरी तथाकथित लोकसंख्यावाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रियतृप्ती करणे होय. म्हणून वेदांनी इंद्रियतृप्ती नियमनासाठी पवित्र विविवाहबंधनाची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च पिरपूर्णता म्हणजे भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करणे होय. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते. म्हणून जर मनुष्य वेदांनुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल? आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोलावे? विविध स्वर्गलोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात. त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यांसाठी अमर्याद सुख उपलब्ध असते. परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्णभावनेद्वारे आध्यात्मिक लोकामध्ये प्रवेश करणे होय. म्हणून कृष्णभावनाभावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे.