No edit permissions for मराठी

TEXT 7

yadā yadā hi dharmasya
glānir bhavati bhārata
abhyutthānam adharmasya
tadātmānaṁ sṛjāmy aham

 यदा यदा-जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे ; हि - निश्‍चितच; धर्मस्य-धर्माचे; ग्लानि:-ग्लानी किंवा र्‍हास; भवति-होतो; भारत-हे भरतवंशजा; अभ्युत्थानम्-वर्चस्व; अधर्मस्य-अधर्माचे; तदा-त्या वेळी; आत्मानम्-स्वत:; सृजामि-प्रकटतो; अहम्-मी.

जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा र्‍हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्या वेळी हे भारता! मी स्वत: अवतीर्ण होतो.

तात्पर्य: या ठिकाणी सृजामि हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सृजामि शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही. कारण पूर्वीच्या श्‍लोकानुार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरीत्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपांची किवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. म्हणून सृजामि शब्दाचा अर्थ असा आहे, की भगवंत स्वत:च्या मूळ रूपात जसे आहेत तसेच स्वत:ला प्रकट करतात. भगवंत ठरावीक कालांतराने अवतरित होत असतात, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, सातव्या मनूच्या अठ्ठाविसाव्या चतुर्युगाच्या द्वापार युगाच्या शेवटी अवर्तीण झाले. पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्मांचा लोप होतो, तेव्हा भगवंत स्वत:च्या इच्छेनुसार अवतरित होताता. धर्माची तत्त्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद्भागवतात सांगण्यात आले आहे की, ही धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलत: वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले. म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या आज्ञाच आहेत. (धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतम्) या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे.  भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वत:च आज्ञा देतात की, त्यांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वैदिक तत्वे मनुष्याला, भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात, तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद्भागवतावरून आपल्याला कळून येते की, बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि  भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत, तरी जे आसुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे  विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रांत करण्यात आले आहे. जोपर्यंत शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही. तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात, पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवद्भावनायुक्त  होण्यास आणि धर्म-तत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वत: अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला, आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वत:च प्रकट होतात.

भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेचव ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते. कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्यांच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. दोन अधिक दोन बरोबर चार होतता हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो. त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच, म्हणूनच याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकविले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांतांचा प्रारंभ, पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्णभावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते.

« Previous Next »