No edit permissions for मराठी

TEXT 26

patraṁ puṣpaṁ phalaṁ toyaṁ
yo me bhaktyā prayacchati
tad ahaṁ bhakty-upahṛtam
aśnāmi prayatātmanaḥ

पत्रम्-पान; पुष्पम्-फूल; फलम्-फळ; तोयम्-पाणी; यः-जो कोणी; मे-मला; भक्त्या—भक्तिभावाने; प्रयच्छत—अर्पण करतो; तत्—ते; अहम्—मी; भक्ति-उपहतम्—भक्तीने अर्पण केलेले; अश्नामि-स्वीकार करतो; प्रयत-आत्मन:-शुद्ध भावनेने.

जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो.

तात्पर्य: बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी, नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममयी भगवत्सेवेमध्ये, कृष्णभावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे. भगवद्धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण सर्वांत गरीब मनुष्यही पूर्वपात्रतेविना करू शकतो. यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही. हा विधी इतका सहजसुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्णभावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्णभावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्याजोगी आहे. इतक्या सहजसोप्या पद्धतीद्वारे कृष्णभावनाभावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूख कोण असू शकेल? श्रीकृष्णांना प्रेममयी सेवेव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. कृष्णभावनेचा विकास करणे म्हणजेच जीवनाची परिपूर्णता गाठणे होय. श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शविण्यासाठी या श्लोकामध्ये 'भक्ती' या शब्दाचा दोन वेळा उल्लेख करण्यात आला आहे. इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ, ब्राह्मण, विद्वान पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत, कोणाकडूनही कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करण्यास तयार होत नाहीत. भक्ती ही कधीच हेतुप्रेरित नसते. भक्ती ही शाश्वत आहे आणि परम सत्याच्या सेवेप्रीत्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे.

          भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोक्ता, आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतात. शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची -दिव्य प्रेममयी भगवत्सेवा- प्राप्ती करण्यासाठी जर मनुष्याला भगवद्भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे. जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो तो, त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांनी न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो. यास्तव मांस, मासे आणि अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावी अशी त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते. याउलट ते स्पष्टपणे सांगतात की, मनुष्याने मला एखादे पान, फळ, फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन. म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस, मासे, अंडी यांचा स्वीकार करणार नाहीत. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे. याव्यतिरित आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही, कारण ते त्याचा स्वीकार करणार नाहीत. जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममयी सेवा करू शकणार नाही.

          तिस-या अध्यायातील पंधराव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत व ज्यांना संसारबंधनातून मुक्त व्हावयाचे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे. त्याच श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की, जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत, ते केवळ पापच भक्षण करतात. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजालाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे. त्यायोगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते. मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचारशुद्धी होते. मनुष्याने सर्वांत महत्त्वाची गोष्ट प्रेमभावाने अर्पण करावी. श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करावयाची इच्छा आहे, त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात. खाद्यपदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे की, या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत.

          परम सत्य हे इंद्रियरहित आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दर्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे; परंतु वस्तुत: भगवान श्रीकृष्णांना इंद्रिये आहेत आणि असे म्हटले आहे की, त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. श्रीकृष्णांना परम सत्य म्हणण्याचा आशय हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण (षडश्वैर्यांनी पूर्ण) म्हणताच आले नसते. सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात. भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही. भगवंत परम सत्य असल्याकारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्याची चव घेण्यासमान आहे या मुद्दयावर अधिक जोर दिला पाहिजे. जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करतो, तोच केवळ जाणू शकतो की, परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते.

« Previous Next »