No edit permissions for मराठी

पार्श्वभूमी

     भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित व वाचली जात असली तरी मूलत: ती संस्कृत महाकाव्य ‘महाभारत’ यात सापडते.   महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी, सुमारे 5000 वर्षांपूर्वी, भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली.

त्यांच्यातील संवाद, जो मानवी इतिहासातील सर्वांत महान तत्त्वज्ञानाविषयक व धर्मविषयक संवादांपैकी एक आहे, एका युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे शंभर पुत्र व त्यांचे चुलत  बंधू, पांडव यांच्यात घडले.

     धृतराष्ट्र व पांडू हे दोन भाऊ होते व त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासून आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता, त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले.

     पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या पाच पुत्रांचे पालनपोषण, काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र व पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजघराण्यात वाढले. दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णात केले व पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले.

     तरी देखील, धृतराष्ट्राचे पुत्र व खास करून सर्वांत थोरला पुत्र दुर्योधन, पांडवाचा अतिशय द्वेष करायचे आणि आंधळ्या व दुष्टप्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची इच्छा होती की, पांडूच्या पुत्रांना नव्हे तर त्याच्या पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे.

याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने, दुर्योधनाने पांडूच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला. पांडव, त्यांचे काका विदुर व मामेभाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले.

     श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून, ते तर स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. (ते पांडूची पत्नी व पांडवांची माता कुंती किंवा पृथा हिचे भाचे होते.) अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले व त्यांचे रक्षण करीत राहिले.

अखेरीस, धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत-क्रीडेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी, हिला ताब्यात घेतले व भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली; परंतु त्या द्यूत-क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना तेरा वर्षे वनवास भोगावा लागला.

     वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपल्या न्याय्य हक्काचे राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली; परंतु त्याने साफ नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळत्रे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता म्हणून त्यांनी आपली मागणी कमी करून फक्त पाच गावे मागितली; परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की, सुईच्या टोकाइतकी भूमी देखील मी देऊ इच्छित नाही.

     आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवीत आले होते. तथापि, आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते.

जगभराच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरीसुद्धा, श्रीकृष्ण स्वत: शांतिदूत या नात्याने दुर्योधनाच्या दरबारात गेले व त्यांनी सलोख्याकरिता विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्‍चित झाले.

अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते; परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत. तरी देखील, युद्धपिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वत: युद्ध करणार नव्हते. परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता व ज्याला स्वत: श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते सल्लागार म्हणून उपलब्ध होते. राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती.

     अशा प्रकारे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले व त्या महान धनुर्धारीचा रथ हाकू लागले. आता आपण त्या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत, ज्या वेळी भगवद्गीतेचा शुभारंभ होतो. दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारतो की, त्या दोन पक्षांनी काय केले?

अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी तयार आहे व जाता जाता या अनुवाद व तात्पर्याविषयी एक छोटीशी टीप देणे आवश्यक वाटते.

     भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकांनी जो साधारण कित्ता गिरविला आहे तो म्हणजे, ‘श्रीकृष्ण’ या व्यक्तीला दूर सारून स्वत:च्याच कल्पना व तत्त्वज्ञानाकरिता जागा करून घेणे होय. महाभारताच्या इतिहासाला लोक दंतकथा म्हणतात आणि कोणा एका अज्ञात, प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरिता ‘श्रीकृष्ण’ हे एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात.

परंतु जशी गीता प्रत्यक्षच स्वत:बद्दल सांगते त्यानुसार, भगवान श्रीकृष्ण हेच गीतेचे लक्ष्य व विषयवस्तू दोन्हीही आहेत.

तर, हा अनुवाद व त्याच्याबरोबरचे तात्पर्य वाचकाला श्रीकृष्णांपासून दूर घेऊन जाण्याऐवजी त्यांच्या दिशेने अग्रेसर करील. या दृष्टीने ‘भगवद्गीता -जशी आहे तशी’ हा ग्रंथ अद्वितीय आहे. दुसरी महत्त्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगत व आकलनीय होते. श्रेकृष्ण गीतेचे वक्ता व त्याचबरोबर अंतिम उद्दिष्ट असल्याकारणाने, हा एकमात्र अनुवाद आहे, जो या महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे.

-प्रकाशक

Next »