TEXT 2
sañjaya uvāca
dṛṣṭvā tu pāṇḍavānīkaṁ
vyūḍhaṁ duryodhanas tadā
ācāryam upasaṅgamya
rājā vacanam abravīt
सञ्जय: उवाच - संजय म्हणाला; द्दष्ट्वा- पाहून; तु-पण; पाण्डव-अनीकम्-पांडवांचे सैन्य; व्यूढम्- व्यूहरचना; दुर्योधन-राजा दुर्योधन; तदा- त्या वेळी; आचार्यम् - शिक्षक, गुरु; उपसङ्गम्य-जवळ जाऊन; राजा- राजा; वचनम् - शब्द; अब्रवीत-म्हणाला.
संजय म्हणाला : हे राजन्! पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास आरंभ केला.
तात्पर्य : धृतराष्ट्र हा जन्मत:च आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की, आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण, उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की, पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की, दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले, यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडवसैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यात्कारी मुत्सेद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही.