No edit permissions for मराठी

TEXT 31

na ca śreyo ’nupaśyāmi
hatvā sva-janam āhave
na kāṅkṣe vijayaṁ kṛṣṇa
na ca rājyaṁ sukhāni ca

-नाही; -सुद्धा; श्रेय:- कल्याण; अनुपश्यामि-मला दिसत आहे; हत्वा-ठार मारुन; स्व-जनम्-आपल्या नातलगांना; आहवे-युद्धात; -नाही; काङक्षे-इच्छितो; विजयम्-विजयाची; कृष्ण-हे कृष्ण; -नाही; -सुद्धा; राज्यम्-राज्य; सुखानि-त्याचे सुख; -सुद्धा.

या युद्धामध्ये माझ्या स्वत:च्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे, कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही, आणि हे कृष्ण! त्यापासून प्राप्त होणारे विजयसुख आणि राज्य याची इच्छादेखील मी करू शकत नाही.

तात्पर्य: स्वत:चा वास्तविक स्वार्थ हा श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे, याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधांमुळे आकर्षित होतात. कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचासुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की, दोन प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ, श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढतालढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वत:च्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता. कारण त्याला वाटत होते की, स्वत:च्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वत:च्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता ही होतीच, तथापि, अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वत:ला, वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे.

« Previous Next »