TEXTS 32-35
kiṁ no rājyena govinda
kiṁ bhogair jīvitena vā
yeṣām arthe kāṅkṣitaṁ no
rājyaṁ bhogāḥ sukhāni ca
ta ime ’vasthitā yuddhe
prāṇāṁs tyaktvā dhanāni ca
ācāryāḥ pitaraḥ putrās
tathaiva ca pitāmahāḥ
mātulāḥ śvaśurāḥ pautrāḥ
śyālāḥ sambandhinas tathā
etān na hantum icchāmi
ghnato ’pi madhusūdana
api trailokya-rājyasya
hetoḥ kiṁ nu mahī-kṛte
nihatya dhārtarāṣṭrān naḥ
kā prītiḥ syāj janārdana
किम्-काय लाभ; न:-आम्हाला; राज्येन-राज्यापासून; गोविन्द-हे कृष्ण; किम्-काय; भोगै:-उपभोग घेऊन; जीवितेन-जगून; वा-तसेच; येषाम्-ज्यांच्या; अर्थे-साठी; काङ्क्षितम्-इच्छिलेले; न:-आमच्यामुळे; राज्यम्-राज्य; भोगा:-ऐहिक किंवा सांसारिक भोग; सुखानि-सर्व सुखे; च-सुद्धा; ते- ते सारे; इमे-हे; अवस्थिता:- उभे असलेले, स्थित; युद्धे-या युद्धभूमीत; प्राणान्-प्राण; त्यक्त्वा-सोडून, त्यागून; धनानि-धनाची, ऐश्वर्याची; च-सुद्धा; आचार्य:-गुरुजन; पितर:-पितृगण; पुत्रा:-पुत्र; तथा-तसेच; एव-खचितच्; च-सुद्धा; पितामहा:-पितामह; मातुला:-मामा; श्वशुरा:-सासरे; पौत्रा:-नातवंडे; श्याला:-मेहुणे; सम्बन्धिन:-नातलग; तथा-तसेच; एतान्-हे सर्व; न-कधीच नाही; इन्तुम्-ठार मारण्याची; इच्छामि-मी इच्छा करतो; घ्नत:-मी मारला गेला; अपि-तरी; मधुसूदन-हे मधुसूदन (मधू दैत्याचा वध करणारे); अपि-जरी; त्रै-लोक्य-तिन्ही लोकांचे; राज्यस्य-राज्याच्या; हेतो:- च्या बदल्यात; किम् नु-केवळ काय बोलावयाचे; मही-कृते-पृथ्वीच्या; निहत्य-ठार करून; धार्तराष्ट्रान्-धृतराष्ट्रपुत्रांना; न:-आम्हाला; का-काय; प्रीति:-आनंद; स्यात्-होणार आहे; जनार्दन-हे जनार्दन (सर्व जीवांचे पालनकर्ता)
हे गोविंद! ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वाचा काय लाभ आहे? हे मधुसूदन! जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन! पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार?
तात्पर्य: अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की, त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रियतृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे. जर आपण श्रीगोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या, प्रत्येकाला आपली इंद्रियतृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रियतृप्ती करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखादा स्वत:च्या इंद्रियतृत्पीची अजिबात इच्छा न करता श्रीगोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्रीगोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशत: दिसून येते, कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वत:चे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते; परंतु अर्जुनाला भीती वाटते की, त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वत: त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती.या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की, रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनावयचे होते. त्याला फक्त निमित्तमात्र व्हावयाचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती. भगवद्भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छिता नाही. पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत. स्वत:च्या अपराधांबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात; पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयी होतो.