No edit permissions for मराठी

TEXT 33

tasmāt tvam uttiṣṭha yaśo labhasva
jitvā śatrūn bhuṅkṣva rājyaṁ samṛddham
mayaivaite nihatāḥ pūrvam eva
nimitta-mātraṁ bhava savya-sācin

तस्मात्-म्हणून; त्वम्-तूः उत्तिष्ठ-ऊठ; यशः-यश; लभस्व-प्राप्त कर; जित्वा-जिंकून; शत्रून्-शत्रू; भुङ्क्ष्व-उपभोग घे;राज्यम्-राज्य; समृद्धम्-समृद्ध;मया-माझ्याद्वारे; एव-निश्चितच; एते--हे सर्व; निहताः-मारलेले आहेत; पूर्वम् एव-पूर्वयोजनेनुसार; निमित्त-मात्रम्— निमित्तमात्र; भव-हो; सव्य-सचिन्-हे सव्यसाची.

म्हणून ऊठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची! युद्धामध्ये तू केवळ निमित्तमात्र होऊ शकतोस.

तात्पर्य: युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडू शकतो त्याला सव्यसाची असे म्हणतात. अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण शत्रूंना मारण्याकरिता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता. 'तूकेवळ निमित्तमात्र हो.' निमित्तमात्रम्हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण आहे. संपूर्ण जगताचे संचलन भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे. ज्ञानाचा अभाव असणा-या मूर्खांना वाटते की, प्रकृतीचे संचलन हे योजनेविनाच होत आहे आणि सारे सृष्ट पदार्थ हे आकस्मिकरीत्या उद्भवले आहेत. असे अनेक तथाकथित वैज्ञानिक आहेत, जे सुचवितात की, कदाचित सृष्टी ही अशी होती किंवा अशी असेल किंवा तशी होती. परंतु 'कदाचित असे असेल' आणि 'तसे असेल'चा प्रश्न उद्भवण्याचे कारणच नाही. या प्राकृत जगतात सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत असते. ही योजना काय आहे? ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वगृही, भगवद्धामात परत जाण्याची संधीच आहे. जोपर्यंत त्यांच्यामध्ये अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच ते बद्ध झालेले असतात. तथापि, जो भगवंतांची योजना जाणतो आणि कृष्णभावनेची जोपासना करतो तो बुद्धिमान व्यक्ती होय. भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतात. म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्याच योजनेनुसार लढले गेले. अर्जुन युद्ध करण्याचे नाकारीत होता; परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले. तेव्हाच तो सुखी होऊ शकेल. जर मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होय.

« Previous Next »