TEXT 9
atha cittaṁ samādhātuṁ
na śaknoṣi mayi sthiram
abhyāsa-yogena tato
mām icchāptuṁ dhanañ-jaya
अथ-जर, म्हणून; चित्तम्-चित्त, मन; समाधातुम्-स्थिर करणे; न-नाही; शक्नोषि-तुला शक्य असेल; मयि-माझ्या ठायी; स्थिरम्-स्थिरपणे; अभ्यास-योगेन-भक्तियोगाच्या अभ्यासाने; ततः-तर; माम्-मला; इच्छा-इच्छा कर; आप्तुम्-प्राप्त करण्याची; धनम्-जय-हे धनंजय, संपत्तीवर विजय मिळविणारा.
हे धनंजय! जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्त्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर.
तात्पर्य: या शलोकात भक्तियोगाच्या दोन निरनिराळ्या विधींचे वर्णन करण्यात आले आहे. ज्याने दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी आसक्ती विकसित केली आहे त्याचा समावेश प्रथम विधीमध्ये होतो आणि ज्याच्या ठायी दिव्य प्रेमाद्वारे भगवंतांविषयी आसक्ती विकसित झालेली नाही त्याचा दुस-या विधीमध्ये समावेश होतो. या दुस-या विधीकरिता निरनिराळी नियामक विविविधाने आहेत आणि त्यांचे पालन केल्याने, श्रीकृष्णांच्या ठायी अनुराग उत्पन्न होण्याइतपत मनुष्याची उन्नती होते.
भक्तियोगाद्वारे इंद्रियांचे शुद्धीकरण होते. सद्यस्थितीत बद्ध जीवनामध्ये इंद्रियतृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिये नेहमी अशुद्धच असतात. परंतु भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रियांचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्धावस्थेमध्ये इंद्रियांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो. या सांसारिक जीवनामध्ये मी कोणा तरी मालकाची चाकरी करीत असेन, पण मी खरोखर प्रेमाने मालकाची सेवा करीत नाही. धनप्राप्ती करण्यासाठी केवळ मी चाकरी करीत असतो आणि मालकालाही प्रेमाशी वगैरे मुळीच कर्तव्य नसते. तो माझ्याकडून काम करून घेतो आणि मला मोबदला देतो, तेव्हा प्रेमाचा प्रश्नच नाही; परंतु आध्यात्मिक जीवनाकरिता मनुष्याने शुद्ध प्रेमावस्थेप्रत उन्नत झाले पाहिजे. अशी प्रेमाची अवस्था, याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते.
वर्तमान स्थितीत हे भगवत्प्रेम प्रत्येकाच्या हृदयात सुप्तावस्थेमध्ये असते. हृदयामध्ये हे भगवत्प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते; परंतु ते भौतिक संगामुळे प्रदूषित झालेले असते. हृदयाचे भौतिक संगापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविक कृष्णप्रेम पुनर्जागृत केले पाहिजे. हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे.
भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रात:काळी लौकर उठून स्नान करणे, अर्चाविग्रहाला फुले वेचून अर्पण करणे, अर्चाविग्रहासाठी भोग तयार करणे, प्रसाद ग्रहण करणे इत्यादी. याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधिनियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता व श्रीमद्भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे. अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य भगवत्प्रेमाच्या अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो. विधिविधानांनुसार आणि आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत्प्रेमाच्या स्तराप्रत उन्नती होते.