No edit permissions for मराठी

TEXT 10

abhyāse ’py asamartho ’si
mat-karma-paramo bhava
mad-artham api karmāṇi
kurvan siddhim avāpsyasi

अभ्यासे-अभ्यास करण्यामध्ये; अपि-जरी; असमर्थ:-असमर्थ; असि-तू आहेस; मत्कर्म—माझे कर्म, परमः—परायण; भव—हो; मत्-अर्थम्—माझ्याकरिता; अपि—जरी, कर्माणि-कर्म; कुर्वन्—करून; सिद्धिम्-सिद्धी; अवाप्स्यसि-तू प्राप्त करशील.

जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल.

तात्पर्य: आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विधिविधानांचेही पालन करू शकत नाही, तो सुद्धा भगवंतांप्रीत्यर्थ कर्म करून पूर्णावस्थेप्रत उन्नत होऊ शकतो. हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच अकराव्या अध्यायाच्या पंचावन्नाव्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. कृष्णभावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. कृष्णभावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते. म्हणून जर भक्तियोगाच्या विधिविधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचारकार्याला साहाय्य करू शकतो. कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि  परिश्रमाची आवश्यकता असतेच. ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये, मनुष्याला राहण्याकरिता जागा, गुंतवणुकीसाठी भांडवल, परिश्रम आणि विस्तार करण्यासाठी संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे या गोष्टींची कृष्णसेवेमध्येही आवश्यकता असते. यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रियतृप्तीकरिता केले जाते. तथापि, तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करता येते. असे कर्म म्हणजेच आध्यात्मिक कर्म होय. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्णभावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक साहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सहयोग करू शकतो, असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्णभावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो. कृष्णभावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत्प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो.

« Previous Next »