No edit permissions for मराठी

अध्याय बारावा

भक्तियोग(श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा)

TEXT 1: अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्यरीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते?

TEXT 2: श्रीभगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत.

TEXTS 3-4: परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून, अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात.

TEXT 5: ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय कलेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते.

TEXTS 6-7: परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्यभावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा, हे पार्था, मी जन्ममृत्यूरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो.

TEXT 8: माझ्यावर (पुरुषोत्तम भगवंतांवर) तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निःसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील.

TEXT 9: हे धनंजय! जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्त्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर.

TEXT 10: जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल.

TEXT 11: तथापि, तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर.

TEXT 12: तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलत्यागामुळे मनुष्याला मन:शांती प्राप्त होते.

TEXTS 13-14: जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे.

TEXT 15: ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे.

TEXT 16: जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे.

TEXT 17: जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे.

TEXTS 18-19: जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत-उष्ण, सुख-दुःख, स्तुती-निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे.

TEXT 20: जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्यधिक प्रिय आहेत.

« Previous Next »