TEXT 12
yad āditya-gataṁ tejo
jagad bhāsayate ’khilam
yac candramasi yac cāgnau
tat tejo viddhi māmakam
यत्-जे; आदित्य-गतम्-सूर्यप्रकाशामध्ये; तेजः-तेज; जगत्-संपूर्ण जगत; भासयते-प्रकाशित करते; अखिलम्-अखिल; यत्-जे, चन्द्रमसि-चंद्रामध्ये; यत्-जे, च-सुद्धा; अग्नौ-अग्नीमध्ये; तत्-ते; तेजः-तेज; विद्धि-जाण; मामकम्-माझ्यापासून.
अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते.
तात्पर्यः सर्व गोष्टी कशा घडत आहेत हे निबुद्ध लोक जाणू शकत नाहीत; परंतु भगवंत या ठिकाणी जे वर्णन करीत आहेत ते जाणून मनुष्य ज्ञानप्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो. प्रत्येकजण सूर्य, चंद्र आणि विद्युतशक्ती पाहतो. मनुष्याने हे केवळ जाणले पाहिजे की, सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युतशक्तीचे तेज हे भगवंतांपासूनच येत आहे. अशा प्रारंभिक कृष्णभावनामय जीवनामध्येच प्राकृत जगतातील बद्ध जीवाची प्रगती दडलेली असते. जीव हे भगवंतांचे अंश आहेत. आणि या ठिकाणी भगवंत, जीव स्वगृही भगवद्धामात परत कसे येऊ शकतात, याची सूचना देत आहेत.
या श्लोकावरून आपण जाणू शकतो की, सूर्यच संपूर्ण सूर्यमालिकेला प्रकाशित करीत आहे. अनेकविध ब्रह्मांडे आणि सूर्यमालिका तसेच अनेक सूर्य, चंद्र आणि ग्रहलोकही आहेत. परंतु प्रत्येक ब्रह्मांडामध्ये केवळ एकच सूर्य आहे. भगवद्गीतेत (१०.२१) सांगितल्याप्रमाणे चंद्रही नक्षत्रांपैकीच एक आहे. (नक्षत्राणमहं शशी) सूर्यप्रकाशही भगवंतांच्या आध्यात्मिक विश्वातील आध्यात्मिक तेजापासूनच येतो. सूर्योदयाबरोबरच मनुष्यांच्या क्रियाकर्मांना चालना मिळते. ते अन्न शिजविणे, कारखाने चालविणे इत्यादी गोष्टींसाठी अग्नी पेटवितात. अशा प्रकारे अग्नीच्या साहाय्याने अनेक गोष्टी घडतात. म्हणून सूर्योदय, अग्नी आणि चंद्रप्रकाश हे जीवांसाठी अतिशय सुखदायक आहेत. त्यांच्या साहाय्यावाचून कोणताही प्राणिमात्र जगू शकत नाही. यास्तव जर मनुष्याने जाणले की, सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचा प्रकाश आणि तेज भगवान श्रीकृष्णांपासूनच उत्सर्जित होत आहे तर त्याच्या कृष्णभावनेस प्रारंभ होतो. चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पतींचे पोषण होते. चंद्रप्रकाश हा अत्यंत शीतल आणि आल्हाददायक असल्यामुळे, लोक सहजपणे जाणू शकतात की, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच केवळ आपण जिवंत आहोत. त्यांच्या कृपेविना चंद्र, सूर्य किंवा अग्नी असू शकत नाही आणि चंद्र, सूर्य किंवा अग्नीच्या साहाय्यावाचून कोणीही जगू शकत नाही. बद्ध जीवामध्ये कृष्णभावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे काही विचार करीत आहेत.