No edit permissions for मराठी

TEXT 13

gām āviśya ca bhūtāni
dhārayāmy aham ojasā
puṣṇāmi cauṣadhīḥ sarvāḥ
somo bhūtvā rasātmakaḥ

गाम्—ग्रहलोक; आविश्य-प्रवेश करून; -सुद्धा; भूतानि—जीव; धारयामि-धारण करती, अहम्-मी; ओजसा-माझ्या शक्तीद्वारे; पुष्णामि-पोषण करतो; -आणि; औषधी:- वनस्पती, सर्वाः-सर्व; सोमः-चंद्र; भूत्वा-होऊन; रस-आत्मक:-रसपुरवठा करून.

मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो.

तात्पर्य: भगवंतांच्या शक्तीमुळेच सर्व ग्रह अंतरिक्षात तरंगत आहेत. भगवंत, प्रत्येक अणू ग्रह आणि जीवामध्ये प्रवेश करतात. याचे विवेचन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की, भगवंतांचा एक अंश परमात्मा ग्रहलोक, ब्रह्मांड, जीव आणि अणूंमध्येही प्रविष्ट होतो. म्हणून त्यांच्या प्रवेश करण्यानेच सर्व काही योग्य रीतीने व्यक्त होते. जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो तेव्हा सजीव मनुष्य पाण्यावर तरंगू शकतो; परंतु आत्मा देहत्याग करतो तेव्हा शरीर मृत होते आणि असे मृत शरीर पाण्यामध्ये बुडते. अर्थात, जेव्हा शरीर सडते तेव्हा गवताप्रमाणे पाण्यावर तरंगते; परंतु ज्या क्षणी मनुष्य मृत होतो तत्क्षणी तो पाण्यामध्ये बुडतो. त्याचप्रमाणे भगवंतांची सर्वश्रेष्ठ शक्ती ग्रहलोकामध्ये प्रवेश करीत असल्यामुळे ते अंतरिक्षात तरंगत आहेत. त्यांच्या शक्तीने मुठीतील धुळीप्रमाणेच प्रत्येक ग्रहाला धारण केले आहे. जर मनुष्याने हाताच्या मुठीत धूळ धरली तर ती खाली पडण्याची शक्यता नाही; परंतु जर त्याने ती फेकली तर लागलीच ती खाली पडते. त्याचप्रमाणे आकाशामध्ये तरंगणा-या ग्रहांना भगवंतांच्या विराटरूपाने आपल्या मुठीत धरले आहे. त्यांच्या शक्तीमुळेच सर्व चराचर वस्तू आपापल्या स्थानी स्थित आहेत. वेदमंत्रांमध्ये म्हटले आहे की, भगवंतांमुळेच सूर्य प्रकाशतो आणि ग्रह स्थिर गतीने भ्रमण करतात. भगवंताविना हवेत फेकलेल्या धुळीप्रमाणेच सर्व ग्रह इतस्ततः विखुरले असते, नष्ट झाले असते. त्याचप्रमाणे भगवंतांमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो. चंद्राच्या प्रभावामुळे वनस्पती रसभरित होतात. चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढही होत नाही किंवा वनस्पती रसाळही होत नाहीत. भगवंतांनी केलेल्या पुरवठ्यामुळेच मानवसमाज कार्यशील आहे, सुखसमाधानाने राहात आहे आणि भोजनाचा स्वाद घेत आहे. अन्यथा मानवसमाज जीवंतच राहू शकला नसता. रसात्मक: हा शब्द महत्वपूर्ण आहे. चंद्राच्या माध्यमातून भगवंतांच्या प्रभावामुळेच सर्व खाद्यपदार्थ चविष्ट बनतात.

« Previous Next »