TEXT 8
śarīraṁ yad avāpnoti
yac cāpy utkrāmatīśvaraḥ
gṛhītvaitāni saṁyāti
vāyur gandhān ivāśayāt
शरीरम्—शरीर; यत्-ज्या; अवाप्नोति—प्राप्त करतो; यत्—ज्याप्रमाणे; च -आणिः अपि-सुद्धा;उत्क्रामति-त्याग करतो; ईश्वरः-देहाचा स्वामी; गृहीत्वा-घेऊन, ग्रहण करून; एतानिही -सर्व; संयाति-जातो; वायुः-वायू; गन्धान्-गंध; इव-प्रमाणे; आशयात्-उगमापासून.
ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुस-या देहात घेऊन जातो. अशा रीतीने, तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो.
तात्पर्य: या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात, देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे, त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. जर त्याची कुत्र्यामांजराप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते आणि जर तो कृष्णभावनाभावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्णलोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सात्रिध्यात वास करतो. शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हा दावा खोटा आहे. जीवात्मा एका देहातून दुस-या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पाश्र्वभूमी असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पना बरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते. हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षति होय.