No edit permissions for मराठी

TEXT 16

aneka-citta-vibhrāntā
moha-jāla-samāvṛtāḥ
prasaktāḥ kāma-bhogeṣu
patanti narake ’śucau

अनेक-अनेक; चित्त-चिंतांनी; विभ्रान्ता:-भ्रांत झालेले; मोह-मोहाच्या; जाल-जाल; समावृता:-आवृत झालेले; प्रसत्ता:-आसत; काम-भोगेषु-इंद्रियतृप्तीला; पतन्ति-पतित होतात; नरके - नरकामध्ये; अशुचौ - अशुची किंवा अपवित्र

या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रियतृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात.

तात्पर्य: आसुरी मनुष्यांच्या धनसंचयाच्या इच्छेला काही अंतच नसतो. धनार्जनाची त्यांची अभिलाषा अमर्याद असते. सध्या आपल्याजवळ किती धन साठलेले आहे आणि ते धन कोणत्या योजना केल्याने अधिकाधिक वाढत जाईल केवळ याचाच तो विचार करीत असतो. यास्तव तो कोणतेही पापकर्म करण्यास संकोच करीत नाही आणि अवैध तृप्तीकरिता तो काळाबाजारही करतो. आपल्याकडे असलेला जमीनजुमला, कुटुंब, घर आणि धनसाठा इत्यादी गोष्टींनी तो मोहित झालेला असतो आणि या गोष्टींमध्ये अधिकाधिक वृद्धी कशी होईल याचीच तो योजना आखीत असतो. त्याला आपल्या सामर्थ्यावर विश्वास असतो आणि जे काही त्याला प्राप्त होत असते ते त्याच्या पुण्यकर्माचे फळ आहे हे त्याला माहीत नसते. त्याला अशा गोष्टींचा संचय करण्याची संधी दिली जाते; परंतु त्याला पूर्वकर्माची मुळीच जाणीव नसते. त्याला वाटते की, केवळ स्वकष्टामुळेच आपल्याला धनप्राप्ती झाली आहे. आसुरी मनुष्याचा कर्माच्या नियमावर विश्वास नसून स्वकर्तृत्वावर विश्वास असतो. कर्माच्या नियमांप्रमाणे मनुष्याच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे तो उच्च कुळात जन्म घेतो, श्रीमंत होतो, सुशिक्षित होतो अथवा सौंदर्यवान होतो. आसुरी लोकांना वाटते की, या सर्व गोष्टी योगायोगाने आणि स्वसामर्थ्यामुळे प्राप्त होतात. विविध प्रकारचे लोक, सौंदर्य आणि शिक्षणाच्या विविधतेमागे काही तरी व्यवस्था असते याची त्यांना जाणीवच होत नाही. जो मनुष्य अशा आसुरी लोकांशी स्पर्धा करतो, तो त्यांचा शत्रू होतो. असे अनेक आसुरी लोक आहेत आणि ते सर्व एकमेकांचे शत्रू आहेत. हे शत्रुत्व व्यक्तीव्यक्तीमतध्ये, कुटुंबाकुटुंबात, नंतर समाजात आणि शेवटी राष्ट्राराष्ट्रात अधिकाधिक वाढत जाते म्हणून जगभर सर्वत्र सतत कलह, युद्ध आणि शत्रुत्व असते.

          प्रत्येक आसुरी मनुष्याला वाटते की, आपण इतरांच्या त्यागावर जगू शकतो. सामान्यतः आसुरी मनुष्याला आपण स्वतःच परमेश्वर असल्याचे वाटते आणि असा आसुरी प्रचारक आपल्या अनुयायांना सांगतो की, 'तुम्ही परमेश्वराचा इतरत्र का शोध करीत आहात. तुम्ही स्वतःच परमेश्वर आहात आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. परमेश्वरावर विश्वास ठेवू नका. परमेश्वराचा धिक्कार करा. परमेश्वर मृत झाला आहे.' असुरांचा असा प्रचार असतो.

          आसुरी मनुष्य जरी पाहतो की, इतर लोकही आपल्याइतकेच श्रीमंत आणि प्रभावी, किंबहुना अधिकच श्रीमंत आणि प्रभावी आहेत, तरी त्याला वाटते की, आपल्यापेक्षा श्रीमंत अथवा प्रभावी कोणीही असू शकत नाही. उच्चतर लोकांप्रत जाण्याबद्दल सांगावयाचे तर त्यांचा यज्ञ इत्यादी करण्यावर विश्वास नसतो. आसुरी लोक विचार करतात की आपण स्वतः रचलेल्या पद्धतीप्रमाणे यज्ञ करू आणि एखाद्या यंत्राच्या साहाय्याने उच्चतर लोकांची प्राप्ती करू. या संदर्भातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रावण होय. त्याने लोकांना सांगितले की, मी स्वर्गामध्ये जाण्यासाठी अशी एक शिडी तयार करेन, जेणेकरून कोणीही वेदोक्त यज्ञयाग न करता स्वर्गप्राप्ती करू शकेल. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये असेच आसुरी लोक यांत्रिक व्यवस्थेद्वारे उच्चतर ग्रहांवर जाण्यासाठी खडतर प्रयास करीत आहेत. ही सारी मोहाची उदाहरणे आहे. परिणामत: त्यांच्या नकळतच ते नरकाच्या दिशेने धावत आहेत. या शलोकातील मोहजाल हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे जाळ्यात अडकलेला मासा बाहेर येऊ शकत नाही त्याचप्रमाणे अशा आसुरी लोकांसाठीही बाहेर पडण्याचा मार्गच नाही.

« Previous Next »