No edit permissions for मराठी

TEXT 24

tasmāc chāstraṁ pramāṇaṁ te
kāryākārya-vyavasthitau
jñātvā śāstra-vidhānoktaṁ
karma kartum ihārhasi

तस्मात्-म्हणून; शास्त्रम्-शास्त्रः प्रमाणम्-प्रमाण; ते-तुझे; कार्य-कर्तव्य; अकार्य-निषिद्ध कर्म: व्यवस्थितौ-निश्चित करण्यामध्ये; ज्ञात्वा-जाणून; शास्त्र-शास्त्र; विधान-विधान; उक्तम्—सांगितल्याप्रमाणे; कर्म-कर्म; कर्तुम्-कर; इह-या जगामध्ये; अर्हसि-तू केले पाहिजे.

म्हणून, मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिले. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल.

तात्पर्य: पंधराव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वेदोक्त विधिविधानांचे उद्दिष्ट श्रीकृष्णांना जाणणे हे आहे. जर भगवद्गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांना जाणून घेतले आणि भक्तीमध्ये संलग्न होऊन तो जर कृष्णभावनेमध्ये स्थित झाला तर त्याने वेदामध्ये सांगितलेल्या परमोच्च ज्ञानाची प्राप्ती केलीच आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी हा विधी अत्यंत सुलभ केला आहे. त्यांनी लोकांना केवळ हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे|या महामंत्राचे कीर्तन करण्याची, भगवद्भक्तीमध्ये संलग्न होण्याची आणि कृष्णप्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली. जो मनुष्य या सर्व भक्तिपूर्ण क्रियांमध्ये प्रत्यक्षपणे संलग्न झाला आहे त्याने सर्व वेदांचे अध्ययन पूर्वीच केले असल्याचे समजले पाहिजे. त्याने निष्कर्षांची योग्य रीतीने प्राप्ती केली आहे. अर्थात कृष्णभावनाभावित नसणा-या आणि भक्तीमध्ये संलग्न न झालेल्या सामान्य लोकांना काय करावे आणि काय करू नये, याचा निर्णय वेदोक्त आदेशानुसार केला जातो. मनुष्याने वादविवाद न करता वेदांनुसार कार्य केले पाहिजे. यालाच शास्त्रतत्त्वांचे पालन करणे असे म्हणतात. अपूर्ण इंद्रिये, फसविण्याची वृत्ती, चुका करणे आणि भ्रमित होणे हे बद्ध जीवांमध्ये आढळणारे चार दोष शास्त्रांमध्ये आढळत नाहीत. या चार प्रमुख दोषांमुळे मनुष्य विधिविधाने घालून देण्यास अपात्र ठरतो. म्हणून दोषातीत असणा-या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या विधिविधानांचा स्वीकार सा-या संत-महंत, आचार्य आणि महात्म्यांनी काहीही बदल न करता  केला आहे.

          भारतामध्ये आध्यात्मिज्ञानाचे दोन पक्ष आहेत. साधारणत: यांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते, सविशेषवादी आणि निर्विशेषवादी. तथापि, दोघेही आपल्या जीवनामध्ये वेदोक्त तत्त्वांचे पालन करतात. शास्त्रविधींचे पालन केल्याविना मनुष्य सिद्धावस्थेपर्यंत प्रगत होते शकत नाही. म्हणून जो शास्त्रांचे वास्तविक तात्पर्य जाणू शकतो त्याला भाग्यवान असे म्हटले जाते.

          मानवसमाजामध्ये, भगवंतांना जाणण्याच्या तत्त्वाला विरोध करणे हेच सर्व प्रकारच्या पतनाचे मूलभूत कारण आहे. मनुष्यजीवनातील हाच घोर अपराध आहे. म्हणून भगवंतांची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप देत असते. ही मायाशक्ती त्रिगुणात्मिका आहे. भगवत्ज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे. सत्वगुणाच्या आदेशापर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य रज आणि तमोगुणामध्येच राहतो आणि हेच त्याच्या आसुरी जीवनाचे कारण असते. जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते शास्त्र, साधू आणि योग्य भगवत्ज्ञानाचा उपहास करतात. ते आध्यात्मिक गुरूच्या आदेशाची अवज्ञा करतात आणि शास्त्रविधींची पर्वा करीत नाहीत. भक्तीचा महिमा ऐकण्यासाठी ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत. याप्रमाणे स्वत:च्या उन्नतीचा मार्ग ते स्वत:च निर्माण करतात. हे मानवी समाजाचे काही दोष आहेत व यामुळेच मनुष्य आसुरी जीवनाच्या आहारी जातात. तथापि, मनुष्याला जर प्रगतिपथावर किंवा सर्वोच्च स्थितीपर्यंत नेणारा योग्य आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरू प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते.

या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘‘दैवासुरसंपदविभागयोग’’ या सोळावा अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous