No edit permissions for मराठी

TEXT 23

yaḥ śāstra-vidhim utsṛjya
vartate kāma-kārataḥ
na sa siddhim avāpnoti
na sukhaṁ na parāṁ gatim

यः-जौ; शास्त्र-विधिम्-शास्त्रविधी; उत्सृज्य-त्याग करून; वर्तते--राहतो; काम-कारतः-- कामाच्या प्रभावाखाली लहरीनुसार कर्म करणारा; -कधीच नाही; :-तो; सिद्धिम्-सिद्धी; अवाप्नोति-प्राप्त करतो; -कधीच नाही; सुखम्-सुख; -कधीच नाही; पराम-परम: गतिम्-सिद्धावस्था किंवा गती.

जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही.

तात्पर्य: पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विविध वर्णासाठी आणि आश्रमांसाठी शास्त्रविधी घालून देण्यात आले आहेत. प्रत्येकाने या विधिविधानांचे पालन करावे अशी अपेक्षा असते. जर मनुष्याने या विधिविधानांचे पालन केले नाही आणि आपल्या काम, क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरीखातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीच सिद्धी प्राप्त करू शकत नाही. दुस-या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याला तात्विकदृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनात त्याचे आचरण केले नाही तर अशा मनुष्याला नराधम समजले पाहिजे. मनुष्यजीवनात, जीवाने सदाचारी असावे आणि परमोच्च सिद्धावस्थेपर्यंत प्रगती करण्याकरिता निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. अशा नियमांचे त्याने पालन केले नाही तर त्याचे अध:पतन होते. तथापि, जरी त्याने विधिविधानांचे आणि नैतिक मूल्यांचे पालन केले आणि शेवटी भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत तो येऊ शकला नाही तर त्याचे सारे ज्ञान व्यर्थच ठरते. परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तरी त्याचे प्रयत्न निष्फळच ठरतात. म्हणून मनुष्याने क्रमाक्रमाने कृष्णभावनामय भक्तीच्या स्तराप्रत स्वत:ची उन्नती केली पाहिजे. त्याच वेळी तात्काळ त्याला परमोच्च संसिद्धी प्राप्त होऊ शकते, अन्यथा नाही.

          काम-कारतः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो. त्याला माहीत असते की, हे निषिद्ध आहे तरीही तो असे कार्य करतोच. यालाच स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अमुक गोष्ट केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करीत नाही, म्हणूनच त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंतांच्या शिक्षेस पात्र ठरतात आणि त्यांना मनुष्यजीवनामध्ये प्राप्त करावयाची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. मानवी जीवन हे विशेषकरून जीवनशुद्धी करून घेण्याकरिता असते आणि जो मनुष्य विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही. तसेच त्याला वास्तविक सुखप्राप्तीही होत नाही.

« Previous Next »