TEXT 20
sarva-bhūteṣu yenaikaṁ
bhāvam avyayam īkṣate
avibhaktaṁ vibhakteṣu
taj jñānaṁ viddhi sāttvikam
सर्व-भूतेषु-सर्व जीवांमध्ये; येन-ज्यामुळे; एकम्-एकच; भावम्-स्थिती; अव्ययम्-अविनाशी; ईक्षते-एखादा पाहतो; अविभक्तम्-अविभाजित; विभतेषु-अनंत विभागात वाटलेले; तत्–ते; ज्ञानम्—ज्ञान, विद्धि—जाण; सात्त्विकम्-सात्त्विक,
ज्या ज्ञानामुळे अनंत रूपांत विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त' आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज.
तात्पर्य: जो मनुष्य प्रत्येक प्राण्यात मग तो देवता, पशू, पक्षी, जलचर किंवा वनस्पती असो त्या सर्वांमध्ये आत्मा पाहतो त्याचे ज्ञान सात्विक असते. सर्व प्राण्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार जरी निरनिराळे देह प्राप्त झाले असले, तरी सर्वांमध्ये एकच आत्मतत्त्व असते. सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शरीरातील प्राण-शक्तीचे प्राकट्य भगवंतांच्या परा प्रकृतीमुळे होत असते. म्हणून प्रत्येक देहामध्ये एकच परा प्रकृती चेतना- पाहणे ही सात्विक दृष्टी होय. देह नश्वर असला तरी ही प्राणशक्ती अविनाशी आहे. भिन्नता ही शारीरिक स्तरावर दिसून येते. प्राणशक्ती विभाजित झाल्याचा भास होतो, कारण बद्ध जीवनात भौतिक अस्तित्वाची अनेक रूपे दिसून येतात. असे निर्विशेष ज्ञान हे आत्मसाक्षात्काराची एक बाजू असते.