TEXT 22
yat tu kṛtsna-vad ekasmin
kārye saktam ahaitukam
atattvārtha-vad alpaṁ ca
tat tāmasam udāhṛtam
यत्-जे; तु-परंतुः कृत्स्न-वत्-हेच काय ते सर्वस्व म्हणून; एकस्मिन्-एकाच; कार्ये— कार्यात; सक्तम्-आसक्त; अहैतुकम्—कारण नसताना; अतत्त्व-अर्थ-वत्—सत्य न जाणता; अल्पम्-अतिशय तुच्छ; च-आणि; तत्-ते; तामसम्-तमोगुणी;उदाहृतम्-म्हटले आहे.
आणि ते ज्ञान, ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहात नाही व जे अतिशय अल्प असते, त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात.
तात्पर्यः सर्वसाधारण मनुष्याचे 'ज्ञान' नेहमीच तमोगुणी असते, कारण बद्धावस्थेतील सर्व जीव जन्मापासूनच तमोगुणात असतात. जो आचार्याच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदेशानुसार ज्ञान विकसित करीत नाही त्याचे ज्ञान देहापुरते मर्यादित असते. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्म करण्याची त्याला फिकीर नसते. त्याच्याकरिता धन हेच ईश्वर असते आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागविणे होय. अशा ज्ञानाचा परम सत्याशी काही संबंध नसतो. हे ज्ञान बहुतकरून आहार, निद्रा, भय, मैथुन या सामान्य पशूच्या ज्ञानासारखे असते. असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते असे येथे म्हटले आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, या शरीराच्या पलीकडे असलेल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात. ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म यांच्या जोरावर अनेक सिद्धांत व वाद निर्माण होतात त्याला रजोगुणी ज्ञान म्हणतात आणि देह सुखसोयीत कसा ठेवता येईल या संबंधीच्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात.