TEXT 48
saha-jaṁ karma kaunteya
sa-doṣam api na tyajet
sarvārambhā hi doṣeṇa
dhūmenāgnir ivāvṛtāḥ
सह-जम्-एकाच वेळी उत्पन्न झालेले; कर्म-कर्म, कौन्तेय-हे कौन्तेय; स-दोषम्-सदोष; अपि-जरी; न-कधीच नाही; त्यजेत्-मनुष्याने त्याग करावा; सर्व-आरम्भा:-सारे उद्योग किंवा प्रयत्न, हि-निश्चितपणे; दोषेण-दोषाने; धूमेन-धुराने; अग्निः-अग्नी, इव-प्रमाणे, आवृता:-आवृत झालेले.
ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कोंतेया! मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये.
तात्पर्यः बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणांद्वारे दूषित झालेले असते. एखादा जरी ब्राह्मण असला तरी यज्ञ करते वेळी त्याला पशुहिंसा करणे भागच असते. त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय कितीही सदाचारी असला तरी त्याला शत्रूशी युद्ध करावेच लागते. कोणत्याही परिस्थितीत तो युद्ध टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे व्यापारी कितीही सदाचारी असला तरी व्यापार टिकवून ठेवण्यासाठी त्याला आपला नफा गुप्तच ठेवावा लागतो किंवा कधी कधी काळाबाजारही करावा लागतो. या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याला टाळणे शक्य नाही. त्याप्रमाणे शूद्राने जरी त्याचा धनी वाईट असला आणि धन्याने दिलेली आज्ञा जरी अयोग्य असली तरी त्याला धन्याची आज्ञा पाळावीच लागते. असे दोष असले तरी मनुष्याने आपले नियत कर्म सुरूच ठेवले पाहिजे कारण नियत कर्म हे त्याच्या स्वभावानुसार उत्पन्न होते.
या ठिकाणी एक सुंदर दृष्टांत देण्यात आला आहे. अग्नी हा जरी मूलत: शुद्ध असला तरी त्यामध्ये धूर असतोच. तरीही धुरामुळे अग्नी अशुद्ध होत नाही. अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वांमध्ये अग्नीलाच सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जाते. एखाद्या क्षत्रियाने जर आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मणाचे कर्म करण्याचे ठरविले तर ब्राह्मणी कर्मामध्ये मुळीच दोष नाहीत असे आश्वासन त्याला कोणीही देऊ शकत नाही. यावरून मनुष्य निष्कर्ष काढू शकतो की, या भौतिक जगतामध्ये कोणीच प्राकृतिक दोषांपासून मुक्त असू शकत नाही. या संदर्भात अग्नी व धुराचे उदाहरण समर्पकच आहे. हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढीत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधी कधी त्रास होतो, परंतु अशा त्रासदायक स्थितीतही मनुष्याला अग्नीचा उपयोग करावाच लागतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. याउलट कृष्णभावनाभावित होऊन केलेल्या नियत कर्माद्वारे भगवंतांची सेवा करण्याचा मनुष्याने दृढ निश्चय केला पाहिजे. हीच खरी सिद्धी होय. भगवंतांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते तेव्हा त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते. याप्रमाणे जेव्हा कर्मफल भक्तियोगामध्ये नियुक्त केल्याने, त्याचे शुद्धीकरण होते तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय.