No edit permissions for मराठी

TEXT 57

cetasā sarva-karmāṇi
mayi sannyasya mat-paraḥ
buddhi-yogam upāśritya
mac-cittaḥ satataṁ bhava

 चेतसा-बुद्धीने; सर्व-कर्माणि-सर्व प्रकारची कर्मे; मयि-मला; सन्यस्य-त्याग करून; मत्परः-माझ्या संरक्षणाखाली; बुद्धि-योगम्-भक्तिपूर्ण कर्मे,; उपाश्रित्य-आश्रय घेऊन; मत्चित्तः-माझ्या भावनेने युक्त होऊन; सततम्-सतत; भव-हो.

सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये, पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो.

तात्पर्य: जेव्हा मनुष्य कृष्णभावनायुक्त कर्मे, करीत असतो तेव्हा तो जगताचा स्वामी या भावनेने कर्मे, करीत नसतो. एखाद्या सेवकाप्रमाणेच मनुष्याने पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार कर्म केले पाहिजे. एखाद्या सेवकाला वैयक्तिक स्वातंत्र्य नसते व तो केवळ स्वामीच्या आज्ञेनुसार कार्य करतो. सर्वश्रेष्ठ स्वामीच्या आज्ञेनुसार कार्य करणारा सेवक लाभ अथवा हानी यांद्वारे प्रभावित होत नाही. तो केवळ आपल्या कर्तव्यांचे भगवंतांच्या आज्ञेनुसार निष्ठेने पालन करतो. आता एखादा मनुष्य तर्कवाद करील की, साक्षात श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन कर्म करीत होता; परंतु जेव्हा श्रीकृष्णांची अनुपस्थिती असते तेव्हा मनुष्याने कसे कर्म करावे? गीतेमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार आणि श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली जर मनुष्याने कर्म केले तर त्यालाही अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णांचे व्यक्तिगत मार्गदर्शन लाभू शकते. या श्लोकामधील मत-परः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा शब्द दर्शवितो की, श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता कृष्णभावनाभावित होऊन कर्म केल्यावाचून मनुष्याला दुसरे कोणतेही ध्येय जीवनात असू शकत नाही. अशा प्रकारचे कर्म करते वेळी केवळ कृष्णचिंतन केले पाहिजे. असा विचार केला पाहिजे की, श्रीकृष्णांनी मला या विशिष्ट कर्तव्याचे पालन करण्याकरिता नियुक्त केले आहे. अशा रीतीने कर्म करताना मनुष्याला स्वाभाविकतःच कृष्णचिंतन करावे लागते. हीच परिपूर्ण कृष्णभावना होय. तथापि, मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे की, लहरीखातर त्याने वाटेल तसे कर्म करून त्याचे फळ भगवंतांना अर्पण करू नये. अशा प्रकारचे कर्म हे कृष्णभावनाभावित असू शकत नाही. त्याने श्रीकृष्णांच्या आदेशानुसार कर्म केले पाहिजे. हा अत्यंत महत्वपूर्ण असा मुद्दा आहे. श्रीकृष्णांचा आदेश हा आध्यात्मिक गुरूंद्वारे गुरुशिष्य परंपरेतून प्राप्त होतो. यास्तव आध्यात्मिक गुरूची आज्ञा ही शिरोधार्य मानली पाहिजे. जर मनुष्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूची प्राप्ती झाली आणि त्याने जर त्यांच्या आदेशानुसार कर्म केले तर त्याची कृष्णभावनेतील सिद्धी ही सुनिश्चित असते.

« Previous Next »