TEXT 41
vyavasāyātmikā buddhir
ekeha kuru-nandana
bahu-śākhā hy anantāś ca
buddhayo ’vyavasāyinām
व्यवसाय-आत्मिक- कृष्णभावनेमध्ये दृढ; बुद्धि:- बुद्धी; एका - केवळ एकच; इह-या जगात; कुरु-नन्दन- हे प्रिय कुरुपुत्रा; बहु-शाखा:- अनेक फाटे; हि- खरोखर; अनन्ता:- अमर्याद; च-सुद्धा; बुद्धय:- बुद्धी; अव्यवसायिनाम् - जे कृष्णभावनाभावित नाहीत त्यांच्या.
जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन! जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात.
तात्पर्य: कृष्णभावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते. या विश्वासालाच व्यवसायात्मिका बुद्धी म्हटले जाते. चैतन्य चरितामृतात (मध्य 22.62) सांगितले आहे की,
‘श्रद्धा’ - शब्दे -विश्वास कहे सुदृढ निश्चय।
कृष्णे भक्ति कैले सर्वकर्म कृत हय॥
‘श्रद्धा’ म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मुनष्य कृष्णभावनाभावित कर्म करु लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रति त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही.गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्णभावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यांमध्ये चांगले फळ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्णभावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्णभावनाभावित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वांच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्णभावनेची परमोच्च परिपूर्णता होय. कृष्णभावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते.
कृष्णभावनाभावित मनुष्यचा दृढसंकल्प हा ज्ञानावर आधारितअसतो. वासुदेव: सर्वम् इति स महात्मा सुदुर्लभ:- कृष्णभावनाभावित व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे. कारण ती पूर्णतया जाणते की, वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टीचे मूळ आहेत. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यामध्ये पोहोचते, त्याचप्रमाणे कृष्णभावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वत:चे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादींची सर्वोकृष्ट सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील.
तथापि, कृष्णभावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो, त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्णभावनाभावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्णभावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या आदेशांचे दृढनिश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुर्वाष्टकामध्ये सांगतात की,
यस्य प्रसादाद् भगवत्प्रसादो यस्याप्रसादान्न गति: कुतोऽपि।
ध्यायन्स्तुवंस्तस्य यशस्त्रिसन्ध्यं वन्दे गुरो: श्रीचरणारविन्दम्॥
‘‘आध्यात्मिक गुरुंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्रीभगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्णभावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून तीन वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे.’’
परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्मबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रियतृप्तींची संधीच नष्ट होते. ज्याचे मन दृढनिश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो.