No edit permissions for मराठी

अध्याय दुसरा

सांख्ययोग(गीतचे सार)

TEXT 1: संजय म्हणाला : कुरुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले.

TEXT 2: पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणाले: हे अर्जुना! तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांत जाण्यात नाही, तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात.

TEXT 3:  हे पार्थ! अशी हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंत:करणाचे असे क्षुद्र दुबळेपणा सोडून दे आणि परंतप !ऊठ.

TEXT 4: अर्जुन म्हणाला : हे अरिसूदन! हे मधुसूदना! मला पूजनीय असणार्‍या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन?

TEXT 5: महात्मासम असणार्‍या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जागणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील.

TEXT 6: त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत.

TEXT 7: माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मन:शांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारीत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा.

TEXT 8: ज्यायोग्य माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणार्‍या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही

TEXT 9: संजय म्हणाला: याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला,‘‘हे गोविंद! मी युद्ध करणार नाही’’ आणि स्तब्ध झाला.

TEXT 10: हे भरतवंशजा! त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण, खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले.

TEXT 11: पुरूषोत्तम श्रीभगवान म्हणाले: पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाही.

TEXT 12: ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही.

TEXT 13: ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही.

TEXT 14: हे कौंतेया! तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदु:खे आहेत ती हिवाळा उन्हाळा यांच्या येण्याजाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा! ती सुखदु:खे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होता आणि मनुष्याने ती क्षुब्ध होता सहन करण्यास शिकले पाहिजे.

TEXT 15: हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना! जो मनुष्य सुख आणि दु: यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे.

TEXT 16: जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, जे असत् (भौतिक शरीर) आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत् (जीवात्मा) आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरुपांचा अभ्यास करून त्वदर्शी पुरूषांनी असा निष्कर्ष काढला आहे.

TEXT 17: जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही.

TEXT 18: अविनाशी, अमर्याद आणि शाश्व जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे, म्हणून हे भरतवंशजा! तू युद्ध कर.

TEXT 19: ज्याला वाटते की, जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही.

TEXT 20: कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वा असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.

TEXT 21: हे पार्थ! जो व्यक्ती जाणतो की, आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील?

TEXT 22: ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करूच नवीन भौतिक शरीर धारण करतो.

TEXT 23: या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही.

TEXT 24: हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्‍चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे.

TEXT 25: हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते, हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस.

TEXT 26: तथापि, जरी तुला वाटते की, आत्मा (किंवा जीवनाची लक्षणे) हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो! तू शोक करणे योग्य नाही.

TEXT 27: जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यपालनात तू शोक करणे योग्य नाही.

TEXT 28: समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे?

TEXT 29: कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. पंरतु दुसरे असे आहे की, जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत.

TEXT 30: हे भरतवंशजा! या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणिमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही.

TEXT 31: क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की, तुला धर्मतत्त्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.

TEXT 32: हे पार्थ! ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गांची द्वारे सताड उघडी होतात.

TEXT 33: परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील.

TEXT 34: लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुषकीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे.

TEXT 35: ज्या मोठमोठ्या महारथी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की, केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील.

TEXT 36: तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांत तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दु:खकर असे तुला काय आहे?

TEXT 37: हे कौंतेया! रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभागेशील. म्हणून दृढनिश्‍चयी होऊन ऊठ आणि युद्ध कर.

TEXT 38: सुख अथवा दु:ख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही.

TEXT 39: आत्तापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे.आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. ह पार्था! जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातूमन मुक्त होऊ शकशील.

TEXT 40: या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा र्‍हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या, भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते.

TEXT 41: जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्‍चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन! जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात.

TEXTS 42-43: अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की, याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही.

TEXT 44: जे लोक इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्‍चय होऊ शकत नाही.

TEXT 45: वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना! या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो.

TEXT 46: लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरीत होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात.

TEXT 47: तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास ते कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस.

TEXT 48: हे अर्जुना! यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते.

TEXT 49: हे धनंजया! भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत.

TEXT 50: भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्य आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे.

TEXT 51: याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषिमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दु:खांच्या पलीकडील स्थानाची (भवगद्धामाची) प्राप्ती करतात.

TEXT 52: जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील.

TEXT 53: जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मा साक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल.

TEXT 54: अर्जुन म्हणाला: हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा?

TEXT 55: श्रीभगवान म्हणाले: हे पार्थ! मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात, विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते.

TEXT 56: जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्हासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यंापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते.

TEXT 57: या भौतिक जगतात जो काणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो.

TEXT 58: ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना, इंद्रियविषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो.

TEXT 59: देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियविषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो.

TEXT 60: इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की, हे अर्जुना! इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरूषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात.

TEXT 61: जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते.

TEXT 62: इंद्रियविषयांचे चिंतन करीत असताना, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो.

TEXT 63: क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते.

TEXT 64: पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्त्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते.

TEXT 65: याप्रमाणे संतुष्ट झालेल्या (कृष्णभावनेमध्ये) व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लौकरच स्थिर होते.

TEXT 66: जो भगवंतांशी संबंधित नाही (कृष्णभावनेमध्ये) त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांतीवाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल?

TEXT 67: ज्याप्रमाणे सोसाट्याचा वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तत: ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते.

TEXT 68: म्हणून हे महाबाहू ! ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते

TEXT 69: सर्व जीवांची जी रात्र असते, ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते.

TEXT 70: ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य, समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारुपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्ती करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही.

TEXT 71: ज्या मनुष्याने इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो नि:स्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, त्यांच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो.

TEXT 72: आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो.

« Previous Next »