TEXT 45
trai-guṇya-viṣayā vedā
nistrai-guṇyo bhavārjuna
nirdvandvo nitya-sattva-stho
niryoga-kṣema ātmavān
त्रै-गुण्य - प्राकृतिक त्रिगुणांशी संबंधित; विषया:-विषयांचे; वेदा:- वैदिक वाङ्मय; निस्त्रै-गुण्य:- भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे; भव-हो; अर्जुन- हे अर्जुन; निर्द्वन्द्व:-द्वंद्वरहित; नित्य-सत्व-स्थ:- विशुद्ध आध्यात्मिक अस्तित्वामध्ये; निर्योग-क्षेम:- लाभ आणि रक्षण यांच्या विचारातून मुक्त; आत्म-वान्- आत्मपरायण.
वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना! या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो.
तात्पर्य : सर्व भौतिक कार्ये ही भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफलप्राप्तींकरिता असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रियतृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषत: सकाम कर्मांचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णांचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वत:ला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ‘ब्रह्मजिज्ञासा’ किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकविण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रियतृप्तीच्या कार्यांचा अंत होतो, अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदांच्या रुपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही पाचव्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे त्याप्रमाणे उननिषदे ही विविध वेदांचाच भाग आहेत. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो.
जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दु:ख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांतून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्णभावनाभावित होतो तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो.