TEXT 52
yadā te moha-kalilaṁ
buddhir vyatitariṣyati
tadā gantāsi nirvedaṁ
śrotavyasya śrutasya ca
यदा-जेव्हा; ते- तुझे; मोह-मोहमयी; कलिलम्-घनदाट अरण्य; बुद्धि:- बुद्धियुक्त दिव्य सेवा; व्यतितरिष्यति - पार करते; तदा- त्या वेळी; गन्ता असि- तू जाशी; निर्वेदम् -तिरस्कार, औदासीन्य; श्रोतव्यस्य- जे ऐकावयाचे आहे त्याचा; श्रुतस्य- जे सर्व ऐकलेले आहे त्याचा; च-सुद्धा.
जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील.
तात्पर्य : केवळ भगवंतांची भक्ति करून वेदांतील कर्मकांडाविषयी जे उदासीन झाले आहेत अशा महान भगवद्भक्तांच्या चरित्रांची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्मांच्या विधींपासून स्वाभाविकपणे पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त, श्रीमाधवेंद्र पुरी म्हणतात.
सन्ध्यावन्दन भद्रमस्तु भवतो भो: स्नान तुभ्यं नमो।
भो देवा: पितरश्च तर्पणविधौ नाहं क्षम: क्षम्यताम् ।
यत्र क्वापि निषद्य यादवकुलोत्तमस्य कंसद्विष: ।
स्मारं स्मारमंघ हरामि तदलं मन्ये किमन्येन मे ॥
‘‘हे माझ्या त्रिसंध्यासमयी प्रार्थना, तुमचा जयजयकार असो. हे स्नान, मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तेथे तेथे यदुकुळाचा महान वंशज, कंसाचा वैरी, श्रीकृष्ण, त्यांचे मी स्मरण करतो. आणि यामुळे मी स्वत:ला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करु शकतो. मला वाटते की, हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.’’
वेदांमधील संस्कार आणि धार्मिक विधी उदाहरणार्थ, दिवसातील त्रिसंध्यासमयी करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी गोष्टी या नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. परंतु जो पूर्णपणे कृष्णभावनाभावित असतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममाण झालेला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वांची प्राप्ती केली असल्यामुळे, तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्त्वांपासून उदासीन बनतो. जर एखादा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही आणि त्याचप्रमाणे वेदांचा हेतू, श्रीकृष्णांची प्राप्ती हा आहे हे न जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला तर तो अशा कर्मांमध्ये व्यर्थ वेळ दवडत आहे. कृष्णभावनाभावित व्यक्ती शब्द - ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात.