TEXT 58
yadā saṁharate cāyaṁ
kūrmo ’ṅgānīva sarvaśaḥ
indriyāṇīndriyārthebhyas
tasya prajñā pratiṣṭhitā
यदा-जेव्हा; संहरते- आवरून घेते; च-सुद्धा; अयम्-हा; कूर्म:-कासव; अङ्गानि-अवयव; इव-प्रमाणे; सर्वश:-सर्व बाजूंनी पूर्णपणे; इन्द्रियाणि-इंद्रिये; इन्द्रिय-अर्थेभ्य:- इंद्रिय विषयांपासून; तस्य- त्याची; प्रज्ञा-भावना, चेतना; प्रतिष्ठिता-दृढपणे स्थिर झालेली.
ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना, इंद्रियविषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो.
तात्पर्य : कोणत्याही येागी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की, तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पांशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परुपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रामध्ये अनेक आदेश, नियम आहेत व त्यापैकी काही विधेयात्मक (सकारात्मक) आहेत तर काही निषेधात्मक (नकारात्मक) आहेत. जोपर्यंत एखादा स्वत: इंद्रियतृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही तोपर्यंत तो कृष्णभावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊन शकत नाही. या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्णभावनाभावित व्यक्तीची इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात नाही तर ती आवरली जातात. या ठिकाणी, आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता, त्यांचा उपयोग भगवत्सेेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकविण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून, आपली इंद्रिये सदैव भवगत्सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे.