TEXT 11
devān bhāvayatānena
te devā bhāvayantu vaḥ
parasparaṁ bhāvayantaḥ
śreyaḥ param avāpsyatha
देवान् - देवता; भावयता- संतुष्ट झाल्यावर; अनेन-या यज्ञाद्वारे; ते - ते; देवा:- देवता; भावयन्तु-संतुष्ट करतील; व:-तुम्हाला; परस्परम्- परस्परांना; भावयन्त:-एकमेकांना संतुष्ट केल्यावर; श्रेय:- वरदान किंवा कल्याण; परम्- परम; अवाप्स्यथ-तुम्ही प्राप्त कराल.
यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने, सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल.
तात्पर्य :देवतांना, भौतिक कार्यांचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपविण्यात आलेले असते. पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य साहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात. परंतु असे असले तरीही सर्व यज्ञामध्ये भगवान श्रीविष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजिले जाते. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्ण हे स्वत: सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तारं यज्ञ तपसाम्, म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. ज्या वेळी असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही.
यज्ञकर्मापासून इतर अनेक आनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंतत: भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. आहारशुद्धौ सत्वशुद्धि: सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृति: स्मृतिलम्भे सर्वग्रन्थींना विप्रमोक्ष: यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्षमार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती, वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्णभावनेमध्ये होते.