No edit permissions for मराठी

TEXT 10

saha-yajñāḥ prajāḥ sṛṣṭvā
purovāca prajāpatiḥ
anena prasaviṣyadhvam
eṣa vo ’stv iṣṭa-kāma-dhuk

सह-च्या बरोबर; यज्ञा:- यज्ञ; प्रजा:- प्रजा; सृष्ट्वा- उत्पन्न करून; पुरा-प्राचीन काळी; उवाच - म्हणाले; प्रजा-पति:- प्रजापती किंवा सर्व जीवांचे उत्पत्तिकर्ता; अनेन-याद्वारे; प्रसविष्यध्वम् - अधिकाधिक समृद्ध व्हा; एष:- या; व:-तुमच्या; अस्तु-होवोत; इष्ट-सर्व इच्छित गोष्टींच्या; काम-धुक् -देणारा किंवा प्रदान करणारा

सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्रीविष्णुंप्रीत्यर्थ, यज्ञसहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की,‘‘तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती  करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील.’’

तात्पर्य : प्रजापतीने (श्रीविष्णू) निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवद्धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य:- वैदिक तत्त्वे ही आपल्याला आपल्या शाश्‍वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की, वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे की, पतिं विश्वस्योत्मेश्वरम्, म्हणून सर्व जीवांचे परमेश्‍वर, पुरुषोत्तम भगवान श्रीविष्णू हेच आहेत. श्रीमद्भागवतातही (2.4.20) श्रील शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे ‘पती’ म्हणून वर्णन करतात:

श्रिय: पतिर्यज्ञपति: प्रजापतिर्धियां पतिर्लोकपतिर्धरापति:।
पतिर्गतिश्चान्धकवृष्णिसात्वतां प्रसीदतां मे भगवान सतां पति:॥

     भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणिमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षणकर्ते आहेत. श्रीविष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावे हे बद्ध जीवांना शिकविण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच ते चिंताविरहीत सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवद्धामामध्ये प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्णभावनाभावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. कलियुगातील संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्णभावना हे परस्परपूरकर आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा (श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू) उल्लेख श्रीमद्भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढीलप्रमाणे केलेला आहे:

कृष्णवर्णं त्विषाकृष्णं सांगापांगास्त्रपार्षदम् ।
यज्ञै: संकीर्तनप्रायैयऐजन्ति हि सुमेधस: ॥

     ‘‘या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते, पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे, संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील.’’ वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही; पण भगवद्गीतेत (9.14) सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सिद्धींकरिता सहज साध्य आणि उदात्त आहे.

« Previous Next »