TEXT 13
yajña-śiṣṭāśinaḥ santo
mucyante sarva-kilbiṣaiḥ
bhuñjate te tv aghaṁ pāpā
ye pacanty ātma-kāraṇāt
यज्ञ-शिष्ट-यज्ञ झाल्यावर शेष राहिलेले अन्न; अशिन:- खाणारे; सन्त:- भक्त; मुच्यन्ते- मुक्त होतात; सर्व-सर्व प्रकारच्या; किल्बिषै:- पापांपासून; भुञ्जते- भोगतात; ते- ते; तु-परंतु; अघम्-घोर पाप; पापा:- पापी लोक; ये-जे; पचन्ति-भोजन बनवितात; आत्म-कारणात्- इंद्रियभोगाकरिता.
भगवद्भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वत:च्या इंद्रियभोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात.
तात्पर्य: भगवद्भक्त किंवा कृष्णभावनाभावित असणाऱ्या व्यक्तींना ‘संत’ म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये (5.38) सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत्प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमाञ्जनच्छुरितभक्तिविलोचनेन सन्त: सदैव हृदयेषु विलाकयन्ति, संतजन हे सदैव भगवान श्रीगोविंद (आनंद देणारा) किंवा मुकुंद (मुक्ती देणारा) किंवा श्रीकृष्ण (सर्वाकर्षक पुरुष) यांच्याशी दुढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते काणेतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे उदाहरणार्थ, श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून अलग राहू शकतात. इतर लोक जे स्वत:साठी किंवा इंद्रियतृप्तीसाठी अन्न शिजवितात ते केवळ चोरच आहेत असे नाही तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ अशक्य आहे, म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हावयाचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्णभावनाभावित ‘‘संकीर्तन यज्ञ’ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे. नाही तर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही.