TEXT 16
evaṁ pravartitaṁ cakraṁ
nānuvartayatīha yaḥ
aghāyur indriyārāmo
moghaṁ pārtha sa jīvati
एवम्- याप्रमाणे; प्रवर्तितम्- वेदांनी प्रस्थापित केलेले; चक्रम- चक्र; न-करीत नाही; अनुवर्तयति-पालान किंवा अंगीकार; इह-या जन्मामध्ये; य:- जो; अघ-आयु:- ज्याचे जीवन पापमय आहे; इन्द्रिय-आराम:- इंद्रियतप्तीमध्येच समाधानी राहणारा; मोघम- व्यर्थपणे; पार्थ-हे पृथापुत्र अर्जुन; स:- तो; जीवति-जगतो.
हे पार्थ! जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्यजीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रियतृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते.
तात्पर्य: ‘‘काबाडकष्ट करा आणि इंद्रियभोग घ्या’’ या भोगवादी तत्त्वाज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी उपर्युक्त पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमांनुसार विशेषतया मनुष्यजीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हींपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही; पण जे इंद्रियतृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपर्युक्त यज्ञ-चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्णभावनाभावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रियविषयात दंग आहेत म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की, ज्यामुळे विषयवासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा, इंद्रियतृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवेदवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्णभावनेचेच आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्णभावनाभावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्णभावनाभावित होत नसेल तर अशा तत्त्वांनाकेवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्णभावनेच्या प्राप्तीसाठी त्यांच्याही पलीकडे गेले पाहिजे.