TEXT 21
yad yad ācarati śreṣṭhas
tat tad evetaro janaḥ
sa yat pramāṇaṁ kurute
lokas tad anuvartate
यत् यत्- जे जे; आचरति-तो करतो; श्रेष्ठ:- एक आदरणीय नेता किंवा श्रेष्ठ व्यक्ती; तत्-ते; तत्-आणि केवळ तेच; एव-निश्चितच; इतर:- सामान्य; जन:- व्यक्ती; स:- तो; यत्-जे; प्रमाणम्-उदाहरण; कुरुते- करतो; लोक:- संपूर्ण जग; तत्-ते; अनुवर्तते-पदचिह्नांचे अनुसरण करतात.
श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्यजन करतात; आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते.
तात्पर्य: सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते, जो व्यावहारिक अचारणांद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वत:च धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की, एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवितो त्याला ‘आचार्य’ किंवा ‘आदर्श शिक्षक’ म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव-समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वत: उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद्भागवतही निश्चितपणे सांगते की, मनुष्याने महान भगवद्भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक,पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्याभोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे.