TEXT 30
mayi sarvāṇi karmāṇi
sannyasyādhyātma-cetasā
nirāśīr nirmamo bhūtvā
yudhyasva vigata-jvaraḥ
मयि-माझ्या ठिकाणी; सर्वाणि- सर्व प्रकारच्या; कर्माणि-कर्मे, सस्य-पूर्णपणे त्याग करून; अध्यात्म-आत्म्याच्या पूर्ण ज्ञानाने; चेतसा-भावनेद्वारे; निराशी:- लाभेच्छारहित; निर्मम:- स्वामित्वाची भावना न ठेवता; भूत्वा-याप्रमाणे होऊन; युध्यस्व-युद्ध कर; विगत-ज्वर:- आळशी न होता.
म्हणून हे अर्जुन! माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन, मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर.
तात्पर्य: भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात ओ आहे. भगवंत असा उपदेश देतात की, जणू काही लष्करी शिस्तीला अनुसुरुन स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे कृष्णभावनाभावित झाले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्यपालन केलेच पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरुप स्थिती आहे. भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. भगवंतांच्या सदिच्छेप्रीत्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत म्हणून जो स्वत:चा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो किंवा दुसऱ्या शब्दांत, जो पूर्णपणे कृष्णभावनाभावित असतो त्याला अध्यात्म चेतस् म्हटले जाते. निराशि: म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रूपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की, जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे, हाच मयि या शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्णभावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. याच भावनेला निर्मम अर्थात् ‘माझे काहीच नाही’ असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता, भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यास जर कोणी नाखूष असेल तर त्याने त्या नाखुषीचा त्याग केला पाहिजे. याप्रकारे तो विगतज्वर अर्थात्, ज्वररहित किंवा आलस्यरहित बनतो. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्णभावनाभावित होऊन केले जाऊ शकते. यामुळे मनुष्य मोक्षमार्गावर अग्रेसर होऊ शकतो.