TEXT 33
sadṛśaṁ ceṣṭate svasyāḥ
prakṛter jñānavān api
prakṛtiṁ yānti bhūtāni
nigrahaḥ kiṁ kariṣyati
सद्दशम्-अनुसार; चेष्टते-प्रयत्न करतो; स्वस्या:- आपल्या स्वत:च्या; प्रकृते-प्रकृतीचे गुण; ज्ञान-वान्-ज्ञानी; अपि-जरी; प्रकृतिम्-प्रकृति;यान्ति- प्राप्त होतात; भूतानि- सर्व जीव; निग्रह:- निग्रह, दमन; किम्-काय; करिष्यति-करू शकेल.
ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वत:च्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण तीन गुणाद्वांरे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे?
तात्पर्य: जोपर्यंत मनुष्य कृष्णभावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही व याची पुष्टी भगवंतांनी सातव्या अध्यायात केली आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्चशिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीरातून आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. असे अनेेक तथाकथित अध्यात्मवादी आहेत, जे वरकरणी ज्ञानामध्ये आपण बरेच प्रगत आहोत असे दर्शवितात. पण अंत:स्थ किंवा खाजगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या पूर्णपणे अधीन झालेले असतात. शैक्षणिकदृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो. पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. भौतिक असित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्णभावना साहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्णभावनाभावित झाल्याविना मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग करू नये. अचानकपणे कोणीही नियत कर्मांचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्णभावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या मायाशक्तीच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो.