TEXT 34
indriyasyendriyasyārthe
rāga-dveṣau vyavasthitau
tayor na vaśam āgacchet
tau hy asya paripanthinau
इन्द्रियस्य - इंद्रियांचे; इन्द्रियस्य अर्थे-इंद्रियविषयांमध्ये; राग-आसक्ती; द्वेषौ-तसेच विरक्ती किंवा अनासक्ती; व्यवस्थितौ-नियमित केली जातात; तयो:- त्यांचे; न-कधीच नाही; वशम्-नियंत्रण; आगच्छेत्-मनुष्याने यावे; तौ-त्यांच्या; हि-निश्चितच; अस्य-त्यांच्या; परिपन्थिनौ- विघ्न आणणारे किंवा अडथळा आणणारे.
इंद्रिय आणि इंद्रियविषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत.
तात्पर्य: जे कृष्णभावनाभावित आहेत त्यांचा स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रियतृप्तीमध्ये मग्न होणयाकडे कल नसतो. पण जे कृष्णभावनाभावित नाहीत त्यांनी शास्त्रामधील विनिधनिषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रियतृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते; पण जो शास्त्रातील विधिनिषेधांचे पालन करतो तो इंद्रियविषयांद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैगिंक उपभोग ही एक बद्ध जीवांसाठी अत्यावश्यक बाब आहे. विवाहबंधनातील लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार, मनुष्याला आपलया पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीबरोबर भोग करण्यास मनाई करण्यात आली आहे, इतर सर्व स्त्रियांना त्याने मातेसमान मानले पाहिजे. पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री-संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे, नाहीतर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक बनतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरविण्यास अनुमती आहे. परंतु या गरजा शास्त्रीय विधिविधानांनुसार भागविण्यास अनुमती आहे आणि तरीही अशा विधिनिषेधांवर आपण विसंबून राहू नये. अशा विधिनिषेधांवर आसक्त न होता मनुष्याने त्यांचे पालन केले पाहिजे, कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते त्याचप्रमाणे विधिनिषेधांनुसार केलेल्या इंद्रियतृप्तीनेही तो वामामार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रियतृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी कालापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रियतृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव नियंत्रित इंद्रियभोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्णभावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो.म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्णभावनेपासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्णभावनोच्या स्तरावर स्थित होणे होय.