No edit permissions for मराठी

TEXT 37

śrī-bhagavān uvāca
kāma eṣa krodha eṣa
rajo-guṇa-samudbhavaḥ
mahāśano mahā-pāpmā
viddhy enam iha vairiṇam

श्री-भगवान उवाच-श्रीभगवान म्हणाले; काम:- काम किंवा विषयवासना; एष:- हा; क्रोध:- क्रोध; एष:- हा; रज:- गुण-रजोगुण; समुद्भव:- यापासून उत्पन्न झालेला; महा-अशन:- सर्व भक्षण करणारा; महा-पाप्मा-महापापी; विद्धि-जाण; एनम्-हा; इह-या भौतिक जगामध्ये; वैरिणम्-परमशत्रू, महान वैरी

श्रीभगवान म्हणाले:हे अर्जुना! रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रुपांतरित होतो, तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे.

तात्पर्य: ज्या वेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या संगामुळे त्याच्या श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्‍वत प्रेमाचे रुपांतर कामविकारात होते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते त्याचप्रमाणे त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या प्रेमभावनेचे रूपांतर काम विकारात होते. नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही तेव्हा क्रोधामध्ये रुपांतरित होतो, क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणून काम हा जीवचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो. क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे. प्रकृतीचे हे गुण स्वत:ला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात. म्हणून जर रजोगुणाचे तमोगुणात अध:पतन करण्याऐवजी, त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीव्दारे सत्वगुणात उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अध:पतनापासून, अध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते.

     पुरूषोत्तम श्रीभगवान हे आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वत:ला अनेक रुपांमध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच अध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत. जीवांना आंशिक स्वातंत्रयही आहे; परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांचा सेवाभाव इंद्रियभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या आधिपत्याखाली येतात. या भौतिक सृष्टीची निर्मिती भगवंतांनी बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी म्हणून केली आहे. दीर्घकाळ कामावसनांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूपस्थितीबद्दल जिज्ञासू होतात.

     ही जिज्ञासा म्हणजेच वेदान्त सूत्रांचा प्रारंभ आहे. वेदान्त सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे की, अथातो ब्रह्मजिज्ञासा - मनुष्याने परम तत्त्वाबद्दल जिज्ञासा करावी. श्रीमद्भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च - म्हणजे परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्तिस्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्णभावनेमध्ये केले किंवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, श्रीकृष्णांच्याच सेवेसाठी सर्व गोष्टीची अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरुप प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीराम यांचा  अनन्य सेवक हनुमान याने रावणाच्या सुवर्णलंकेला भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला; परंतु असे केल्याने तो भगवंतांचा महान भक्त बनला. या ठिकाणी श्रीमद्भगवद्गीतेतही भगवान आपल्या संतुष्टीकरिता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहेत. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्णभावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात.

« Previous Next »