TEXT 1
śrī-bhagavān uvāca
imaṁ vivasvate yogaṁ
proktavān aham avyayam
vivasvān manave prāha
manur ikṣvākave ’bravīt
श्री-भगवान उवाच- श्रीभगवान म्हणाले; इमम्-हा; विवस्वते-सूर्यदेवाला; योगम्-एखाद्याचे भगवंतांशी असण्याऱ्या संबंधाविषयीचे विज्ञान; प्रोक्तवान्-उपदेश केला; अहम्-मी; अव्ययम्-अव्यय किंवा अविनाशी; विवस्वान्-विवस्वान (सूर्यदेवाचे नाव); मनवे-वैवस्वत नामक मानव जातीच जनक; प्राह- सांगितला; मनु:-मानवजातीचा जनक; इक्ष्वाकवे - राजा इक्ष्वाकूला; अब्रवीत-म्हणाला.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले: मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश, मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला.
तात्पर्य: या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. विशेषत: सर्व ग्रहलोकांतील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनातून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्यजीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती यांद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, कृष्णभावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाने अनुसरण करता येईल.
वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये (5.52) सांगण्यात आले आहे की:
यच्चक्षुरेषु सविता सकलग्रहाणां राजा समस्तसुरमूर्तिरशेषतेजा:।
यस्याज्ञया भ्रमति सम्भृतकालचक्रो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ॥
भगवान ब्रह्मदेव म्हणाले,‘‘मी आदिपुरुष श्रीगोविंद यांना सादर प्रणाम करतो, ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो, सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो.’’
सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव (वर्तमान युगातील विवस्वान नामक देव) सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवन श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंतकाळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे.
महाभारतामध्ये (शांतिपर्व 348.51-52) गीतेचा इतिहास आपल्याला पुढीलप्रमाणे आढळतो.
त्रेतायुगादौ च ततो विवस्वान्मनवे ददौ।
मनुश्च लोकभृत्यर्थं सुतायेक्ष्वाकवे ददौ।
इक्ष्वाकुणा च कथितो व्याप्य लोकानवस्थित:।
‘‘त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले. मानवजातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला प्रदान केले आणि महाराज इक्ष्वाकू हे प्रभू श्रीरामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होते.’’ म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे.
4,32,000 वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच पाच हजार वर्षे संपली आहेत. यापूर्वी द्वापार युग (8,00,000 वर्षे) होते आणि द्वापार युगापूर्वी त्रेतायुग (1,20,000 वर्षे) होते. याप्रमाणे सुमारे 2,005,000 वर्षांपूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य, पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य सुमारे 3,05,300,000 इतकी वर्षे आहे आणि त्यापैकी 1,20,400,000 वर्षे व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली हे मान्य केल्यास सर्वसाधारणणे निदान 1,20,400,000 वर्षांपूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 20,00,000 वर्षांपासून अस्तित्वात आहे. पाच हजार वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वनाला गीता सांगण्यात आली, कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरूषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्यावाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील; परंतु त्यांच्या तर्कांना ‘भगवद्गीता-जशी आहे तशी’ असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरुशिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली.