TEXT 20
tyaktvā karma-phalāsaṅgaṁ
nitya-tṛpto nirāśrayaḥ
karmaṇy abhipravṛtto ’pi
naiva kiñcit karoti saḥ
त्यक्त्वा - त्याग केल्यामुळे; कर्म-फल-आसङ्गम्-कर्मफलाची आसक्ती; नित्य-नित्य; तृप्त:-तृप्त झालेला; निराश्रय:- आश्रयरहित; कर्मणि-कर्मामध्ये; अभिप्रवृत्त:- पूर्णपणे मग्न झालेला; अपि-जरी; न-नाही; एव-निश्चितच; किञ्चित्-काहीही; करोति-करतो; स:- तो.
आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून, नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा, जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही.
तात्पर्य: जेव्हा मनुष्य कृष्णभावनेमध्ये म्हणजेच सर्व काही श्रीकृष्णांप्रीत्यर्थ करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. कृष्णभावनाभावित मनुष्य हा केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफलाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते. तो स्वत:चा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो. तो कोणताही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो, तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिताही तो उत्सुक नसतो. तो आपल्या कुवतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवितो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलांपासून मुक्त असतो. जणू काय त्याने काही केलेच नाही. हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे. म्हणून कृष्णभावनाविरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे व याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे.